मुंबई शहर (Photo Credit : Flickr)

देशाची आर्थिक राजधानी मुंबई (Mumbai) पुन्हा एकदा भारतातील सर्वात महागडे (Most Expensive City) शहर ठरले आहे. सोबतच आशियातील सर्वात महागड्या 20 शहरांमध्येही मुंबई शहराचा समावेश झाला आहे. मर्सेस (Mercer) ने नुकताच एक अहवाल सादर केला आहे त्यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. मात्र मुंबईच्या एकूण महागाई दारामध्ये घट झाल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे यावर्षी जगातील महागड्या शहरांच्या यादीमध्ये मुंबईचे स्थान 67 वे झाले आहे.

मुंबईच्या लाईफस्टाईल निगडीत गोष्टींच्या दरांमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे. सोबतच मुंबईमधील खाद्यपदार्थांच्या दरांमध्येही घट झाली आहे. मात्र अजूनही मुंबईमधील घरांच्या किंवा जागांच्या किंमती जगाच्या नकाशावरही जास्तच आहे. देशातील महागड्या शहरांमध्ये मुंबई नंतर दिल्लीचा नंबर लागतो (118), त्यानंतर चेन्नई (154), बंगळूरू (179) आणि नंतर कोलकाता (189) या यादीमध्ये आहे. या सर्वेक्षणात जगातील 209 शहरांचा तसेच 200 वस्तू व सेवांचा अभ्यास करण्यात आला. त्यात घरे, वाहतूक, अन्न, कपडे, घरगुती वापराच्या वस्तू आणि मनोरंजनाची साधने यांचा समावेश आहे.

सलग दुसऱ्या वर्षी हाँगकाँग हे जगातील सर्वात महागडे शहर ठरले आहे. त्यानंतर टोकियो, सिंगापूर आणि सेओल यांचा नंबर लागतो. सर्वात महागड्या दहा शहरांमध्ये झुरिच (5), शांघाय (6), अश्गाबात (7), बीजिंग (8), न्यूयॉर्क शहर (9), आणि शेन्झेन (10) या शहरांचा समावेश होते. तर ट्यूनिस (209), ताशकंद (208) आणि कराची (207) ही जगातील सर्वात स्वस्त शहरे ठरली आहेत.