Fake Wedding | (Photo credit: archived, edited, representative image)

Moga Wedding Fraud: आभासी प्रेमाच्या जाळ्यात अडकून फसवणूक हणाऱ्यांची संख्या कमी नाही. इन्स्टाग्रामवर (Instagram Connection) पाठिमागील तीन वर्षांपासून एका मुलीशी आभासीरित्या बोलत असलेल्या एका तरुणासोबतही असेच काहीसे घडले. दुबईहून वरात (Dubai Groom) घेऊन पंजाबला आलेल्या दीपक कुमार नावाच्या एका 24 वर्षीय तरुणासोबत चित्रपटात घडावी तशी घटना घडली आहे. हा तरुण आपल्या 150 निवडक वऱ्हाड्यांसह दुबईहून भारतात पंजाब येथील मोगा येथे आला पण इथे पोहोचल्यावर त्याला जो धक्का बसला, ज्यातून अद्यापही सावरला नाही. वधू पक्षासोबत झालेल्या चर्चेनुसार तो विवाहासाठी भारतात आला. पण, इथे आल्यावर त्याला कळले की, रोझ गार्डन पॅलेस नावाच्या विवाहस्थळी ना नवरी मुलगी (Fake Wedding Venue) होती, ना वऱ्हाडी असलेले तिचे कुटुंबीय. ही घटना शनिवारी (7 डिसेंबर) उघडकीस आली.

'परिसरात रोझ गार्डन पॅलेस नावाचे ठिकाणच नाही'

दुबई येथे प्रदीर्घ काळ काम करून नुकताच जालंधरला परतलेला मजूर दीपक हा मनप्रीत कौर नावाच्या महिलेशी पाठिमागील तीन वर्षांपासून इन्स्टाग्रामवर बोलत होता. परंतू इतका प्रदीर्घ काळ संवाद असूनही तो तिस कधीही व्यक्तिशः भेटला नव्हता. अशा या अभासी किंवा कल्पनेतील महिलेसोबत विवाह करण्यासाठी हा तरुण वऱ्हाडी घेऊन मोगा येथे आला. दीपक कुमार आणि त्याच्या 150 'बाराती' च्या परिवाराला लग्नस्थळी पोहोचल्यावर धक्का बसला. कारण तिथे लग्नाची काहीच हालचाल दिसत नव्हती. तिथे ना नवरी होती ना कोणी इतर वऱ्हाडी कोणीच नव्हते. खरा धक्का तर तेव्हा बसला, जेव्हा मोगामधील स्थानिक गावकऱ्यांनी सांगितले की, या परिसरात रोझ गार्डन पॅलेस नावाचे कोणतेही ठिकाणच अस्तित्वात नाही. (हेही वाचा, Wedding Fraud: तुम्ही लग्नाचा विचार करत आहात, सावधान! लग्न जमवणाऱ्या फसव्या टोळ्या सक्रिय, घातला लाखोंचा गंडा)

नवऱ्याचा धक्कादायक अनुभव

दीपक कुमार नावाच्या नवऱ्या मुलाने पोलिसांना सांगितले की, तो आणि त्याचे कुटुंब जलंधरच्या मंडियाली गावातून मोगाला गेले. तिथे ते वधूने सांगितलेल्या रोझ गार्डन पॅलेसमध्ये विवाहसोहळा साजरा करण्याच्या प्रतीक्षेत होते. आगमनानंतर, वधूच्या कुटुंबीयांनी त्यांना कळवले की एस्कॉर्ट्स त्यांना कार्यक्रमस्थळी मार्गदर्शन करतील. मात्र, सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाट पाहिल्यानंतर कोणीही आले नाही. त्यानंतर त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यातच मोगामधील स्थानिकांनी या परिसरात रोझ गार्डन पॅलेस नावाचे कोणतेही ठिकाण अस्तित्वात नसल्याचे सांगून कुटुंबाला आणखी धक्का दिला.

पोलिसांत तक्रार दाखल

फोन बंद असलेल्या वधूशी संपर्क साधण्याचे अनेक वेळा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर वराने पोलिसात तक्रार दाखल केली. मोगाचे सहाय्यक उपनिरीक्षक हरजिंदर सिंग यांनी तक्रार मिळाल्याची पुष्टी केली आणि सांगितले की तपास सुरू आहे. पुढे त्यांनी म्हटले की, "आम्हाला तक्रार प्राप्त झाली आहे आणि आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत. वधूचा फोन बंद आहे आणि तिला शोधण्यासाठी आणि तपशीलांची पडताळणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत ", असे एएसआय हरजिंदर सिंग यांनी सांगितले. वराने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दीपकने लग्नाच्या तयारीपूर्वी कौरला 50,000 रुपये हस्तांतरित केले होते. त्याच्यासोबत आलेल्या 150 पाहुण्यांसाठी खानपान, व्हिडिओग्राफी आणि भाड्याने घेतलेल्या टॅक्सीची व्यवस्था केल्याचा दावाही त्याने केला.

दीपक आणि मनप्रीत तीन वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामवर जोडले गेले होते, फोटोंची देवाणघेवाण करत होते आणि ऑनलाइन संबंध प्रस्थापित करत होते. त्यांच्या पालकांनी दूरध्वनीवरून लग्नाची व्यवस्था केली, दीपकचे वडील प्रेमचंद यांनी कार्यक्रमाला पाहुण्यांना आमंत्रित केले. मोगा येथील रहिवासी असलेल्या कौरने यापूर्वी दीपकला सांगितले होते की ती फिरोजपूरमध्ये काम करते.