
New ATM Withdrawal Charges Hike: आजपासून एटीएममधून पैसे काढणे महागले (ATM Withdrawal Charges Increase) आहे. आरबीआय (RBI) च्या सूचनांनुसार बँका गुरुवार, 1 मे 2025 पासून सुधारित एटीएम शुल्क शुल्क लागू करत आहेत. बँकांच्या या निर्णयामुळे, मोफत मर्यादेनंतर एटीएममधून पैसे काढणे महाग होणार आहे. 28 मार्च रोजी रिझर्व्ह बँकेने मोफत मर्यादा संपल्यानंतर शुल्कात वाढ करण्यास मान्यता दिली होती. रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, कोणताही ग्राहक त्याच्या बँकेच्या एटीएममधून एका महिन्यात 5 मोफत व्यवहार करू शकतो. आजपासून, मोफत व्यवहार मर्यादा संपल्यानंतर, तुम्हाला आता प्रत्येक व्यवहारावर 2 रुपये अतिरिक्त आकारले जातील. नवीन नियम लागू झाल्यानंतर, मोफत मर्यादा संपल्यानंतर प्रत्येक व्यवहारावर 23 रुपये शुल्क आकारले जाईल.
रिझर्व्ह बँकेने जारी केली होती अधिसूचना -
दरम्यान, 28 मार्च 2025 च्या आरबीआयच्या अधिसूचनेनुसार, एटीएम इंटरचेंज शुल्क एटीएम नेटवर्कद्वारे ठरवले जाईल. मोफत मर्यादेनंतर, प्रत्येक व्यवहारावर ग्राहकाकडून कमाल 23 रुपये शुल्क आकारले जाऊ शकते. हे शुल्क 1 मे 2025 पासून लागू होईल. आवश्यकतेनुसार बदलांसह, हे निर्देश कॅश रिसायकलर मशीनवर केलेल्या व्यवहारांना देखील लागू होतील. (हेही वाचा - ATM Charges Hiked: मोफत सेवांवरील मर्यादेनंतर एटीएम शुल्कात वाढ, 1 मे पासून नवीन नियम लागू; जाणून घ्या सेवा शुल्क किती रुपयांनी वाढले?)
याशिवाय, नवीन नियमांनुसार, जर तुम्ही दुसऱ्या बँकेचे एटीएम वापरत असाल, तर तुम्ही मेट्रो शहरांमध्ये एका महिन्यात जास्तीत जास्त 3 मोफत व्यवहार आणि नॉन-मेट्रो शहरांमध्ये जास्तीत जास्त 5 मोफत व्यवहार करू शकता. जर तुम्ही तुमच्या बँकेचे एटीएम वापरत असाल तर तुम्ही एका महिन्यात 5 मोफत व्यवहार करू शकता. मोफत व्यवहारांची मर्यादा ओलांडल्यानंतर, तुम्हाला प्रत्येक व्यवहारावर 23 रुपये शुल्क भरावे लागेल. सध्या, मोफत व्यवहार मर्यादा संपल्यानंतर, बँक आपल्या ग्राहकांना प्रति व्यवहार जास्तीत जास्त 21 रुपये आकारू शकते. (हेही वाचा - ATM In Train: आता ट्रेनमध्येही एटीएममधून काढता येणार पैसे! प्रवाशांसाठी मुंबई मनमाड पंचवटी एक्सप्रेस ट्रेनमध्ये सुविधा सुरु)
आजपासून नवीन नियम लागू -
आजपासून स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, पंजाब नॅशनल बँक आणि इंडसइंड बँक यासह अनेक बँकांनी त्यांच्या ग्राहकांसाठी नवीन नियम लागू केले आहेत. बँकांनी सांगितले की, मोफत मर्यादेनंतर प्रत्येक व्यवहारावर 23 रुपये + जीएसटी भरावा लागेल.