जुने ATM Card 1 जानेवारीपासून होणार बंद; असे घ्या बदलून
एटीएम कार्ड (Photo Credit- PTI)

सर्व बँकांचे मॅगनेटिक स्ट्रीप असलेले ATM Card 1 जानेवारीपासून बंद होणार आहे. ग्राहकांना चांगली सेवा प्रदान करण्यासाठी आणि पैशांच्या सुरक्षिततेसाठी बँकांनी हा निर्णय घेतला आहे. कार्डसंदर्भातील ही माहिती सर्व बँका आपल्या खातेधारकांना मेसेज पाठवून देत आहेत. या माहितीनुसार, सर्व ग्राहकांना लवकरच आपले एटीएम कार्ड बदलावे लागणार आहे. ATM Card बदलून न घेतल्यास ते ब्लॉक करण्यात येईल.

बँका ग्राहकांसाठी लवकरच EMV चिप असलेले नवे कार्ड अॅक्टीव्हेट करणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने यासंदर्भात नियमावली जारी केल्याने बँकांनी हे पाऊल उचलले आहे.

नेट बँकींगच्या माध्यमातून

खातेधारक चिप नसलेले एटीएम कार्ड बदलण्यासाठी इंटरनेट बँकींगच्या (Net Banking)  माध्यमातून ऑनलाईन अर्ज करु शकतात. यासाठी काही सोप्या स्टेप्स...

# सर्वप्रथम बँकेच्या वेबसाईटच्या होमपेजवर जा.

# तुमचे युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन (Log In) करा.

# होमपेजवरील ई-सर्व्हीस वर ( e-service) क्लिक करा.

# एटीएम कार्ड सर्व्हीस सिलेक्ट करा.

# एटीएम कार्ड सर्व्हीसमध्ये एटीएम/डेबिट कार्ड चा पर्याय निवडा.

# त्यानंतर ज्या अकाऊंटसाठी तुम्हाला नवे एटीएम कार्ड हवे आहे ते अकाऊंट सिलेक्ट करा.

# त्यानंतर कार्डवर अपेक्षित असलेले नाव भरा आणि एटीएम कार्डचा प्रकार सिलेक्ट करुन सबमिट करा.

बँकेच्या शाखेत जावून

ग्राहक आपल्या बँकेच्या शाखेत जावून जुने एटीएम कार्ड बदलू शकतात. त्यासाठी बँकेतून दिला जाणारा फार्म तुम्हाला भरावा लागेल. फार्म भरुन दिल्यानंतर एका आठवड्याच्या आत तुम्हाला एटीएम कार्ड बदलून मिळेल.

मॅगनेटिक स्ट्रीप असलेले कार्ड सुरक्षित नाही

रिजर्व्ह बँकेनुसार, मॅगनेटिक स्ट्रीप असलेले कार्ड ही जुनी टेक्नोलॉजी आहे. आता या टेक्निकने कार्ड बनवणे देखील बंद झाले आहे. कारण हे कार्ड पूर्णपणे सुरक्षित नाही. त्यामुळेच हे कार्ड बंद करण्यात येत आहे. आता त्याऐवजी EMV चिप कार्ड तयार करण्यात आले आहे आणि सर्व जुनी कार्ड नव्या चिप कार्डने बदलली जातील.

नव्या EMV चिप कार्डच्या डेबिट आणि क्रेडीट कार्डमध्ये एक लहानशी चीप असेल. ज्यात तुमच्या अकाऊंटची पूर्ण माहिती असेल. ही माहिती इनक्रिप्टेड असेल. त्यामुळे यातील डेटा चोरीपासून सुरक्षित राहील. EMV चिप कार्डद्वारे ट्राजेक्शन करताना एक युनिक ट्राजेक्शन कोड जनरेट होईल त्यानंतर कार्ड व्हेरिफाईड होईल. पूर्वीच्या एटीएम कार्डमध्ये या सुविधा उपलब्ध नव्हत्या.