इंदौर ठरले देशातील सर्वात स्वच्छ शहर, भोपाळ सर्वात स्वच्छ राजधानी; टॉप 20 मध्ये कोल्हापूर आणि नवी मुंबई
इंदौर शहर (Photo Credits: Wikimedia Commons)

नुकतीच स्वच्छ सर्वेक्षण-2019 पुरस्कारांची (Swachh Survekshan Awards 2019)ची घोषणा झाली आहे. यामध्ये सलग तिसऱ्या वर्षी मध्य प्रदेश राज्यातील इंदौर (Indore) ला भारतातील ‘सर्वात स्वच्छ शहरा’चा (Cleanest City) मान मिळाला आहे. सोबत भोपाळ सर्वात स्वच्छ राजधानीचे शहर ठरले आहे. 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांत अहमदाबादने बाजी मारली आहे तर, 5 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांत उज्जैन एक नंबरवर आहे. म्हणजेच मध्य प्रदेशमधील तीन शहरांनी स्वच्छ सर्वेक्षणात बाजी मारली आहे. सोबत बेस्ट परफॉर्मिंग प्रदेश म्हणून छत्तीसगढ़ या राज्याची निवड झाली आहे, त्यानंतर झारखंड (Jharkhand) आणि महाराष्ट्राचा (Maharashtra) नंबर लागतो.

दिल्लीच्या विज्ञान भवन येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांनी या पुरस्कारांची घोषणा केली आहे. त्यांनी इंदौरचे महापौर मालिनी गौड, नेते प्रतिपक्ष फौजिया अलीम आणि नगर प्रशासनाचे मंत्री जयवर्धन सिंह यांना हा पुरस्कार सोपविला आहे. इंदौरनंतर दुसऱ्या स्थानावर आहे अंबिकापुर (Ambikapur) तर म्हैसूर (Mysuru) तिसऱ्या स्थानावर आहे. तसेच सर्वात स्वच्छ गंगा शहर म्हणून गौचर, उत्तराखंड या शहराची निवड झाली आहे. (हेही वाचा: दिल्ली ठरली जगातील सर्वात प्रदूषित राजधानी; टॉप 10 मध्ये भारतातील 7 शहरे)

2019 साली 28 दिवसांमध्ये तब्बल 4000 शहरांची पाहणी करण्यात आली होती, त्यातून विविध निकषांच्या आधारे या शहरांची निवड केली गेली आहे. यामध्ये विविध संघांनी 64 लाख लोकांचा फीडबॅकदेखील घेतला होता. सोबत सोशल मिडीयावरून 4 कोटी लोकंनी फीडबॅक दिला होता. हे सर्वेक्षण करणाऱ्या टीमने या शहरांचे 41 लाख फोटो घेतले होते, यातून ही निवडप्रक्रिया पार पडली आहे.