Lok Sabha Elections 2019: आजपर्यंतची जगातील सर्वात महागडी निवडणूक,अमेरिकेचा रेकॉर्ड मोडला; खर्चाचे आकडे पाहून डोळे होतील पांढरे
पीएम मोदी आणि राहुल गांधी (Photo Credits: Twitter@BJP4India/IANS)

अखेर देशातील लोकसभा निवडणुका  (Lok Sabha Elections) संपून नवीन सरकार सत्तेत आले आहे. अतिशय अतिटतीने पार पडलेल्या या निवडणुकीचा डंका कित्येक महिने आधीपासून वाजत होता. भाजप (BJP), कॉंग्रेससह  (Congress) देशातील इतर सर्वच पक्षांसाठी या निवडणुका फार महत्वाच्या होत्या, त्यामुळेच यावर तितका खर्चही करण्यात आला. या निवडणुकीच्या खर्चाचे आकडे पहिले तर अक्षरशः डोळे पांढरे व्हायची वेळ येईल. 7 टप्प्यात 75 दिवस चाललेल्या या निवडणुकीसाठी तब्बल 60 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. अशारितीने भारतात पार पडलेली ही लोकसभा निवडणूक जगातील सर्वात महागडी निवडणूक ठरली आहे.

सेंटर फॉर मिडिया स्टडीज (Centre for Media Studies) यांनी केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. या निवडणुकीत एका मतदारावर 700 रुपये खर्च करण्यात आला आहे, तर प्रत्येक लोकसभा मतदारसंघासाठी 100 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत 30 हजार कोटी रुपये खर्च झाले, जे या वेळी वाढून दुप्पट झाले. अशा प्रकारे 2019 ची लोकसभा निवडणुक आजपर्यंतची सर्वात महागडी निवडणुक ठरली आहे. सीएमसचा दावा आहे की, ही आजपर्यंतची जगातील सर्वांत महागडी निवडणूक आहे.

अहवालानुसार 12 ते 15 हजार कोटी रुपये मतदारांवर खर्च केले आहेत, 20 ते 25 हजार कोटी रुपये जाहिरातींवर खर्च केले आहेत, 5 हजार ते 6 हजार कोटी रुपये लॉजिस्टिकवर खर्च झाले. 10 ते 12 हजार कोटी रुपये औपचारिकरित्या खर्च झाले आहेत, तर 3 ते 6 हजार कोटी रुपये इतर गोष्टींवर खर्च झाले आहेत. निवडणूक आयोगाकडून मान्यताप्राप्त खर्चाची मर्यादा केवळ 10 ते 12 हजार कोटी रुपये होती, मात्र त्याच्या पाच पट खर्च या निवडणुकीसाठी करण्यात आला आहे.

आतापर्यंतच्या निवडणुकीसाठी झालेला खर्च -

1998 – 9 हजार कोटी

1999 – 10 हजार कोटी

2004 – 14 हजार कोटी

2009 – 20  हजार कोटी

2014 – 30 हजार कोटी

2016 मध्ये अमेरिकेत जेव्हा राष्ट्रपती निवडणूक पार पडली त्यावेळी 45 हजार कोटी रुपये खर्च झाले होते. त्यावेळी ती निवडणूक सर्वात खर्चिक मानली गेली होती, मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीने अमेरिकेचा रेकॉर्ड मोडला आहे. विधानसभेबद्दल बोलायचे झाले तर कर्नाटक राज्यातील निवडणुका सर्वात महागड्या ठरल्या होत्या. राज्यात 10 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.