मध्य प्रदेशमध्ये खळबळ; आयकर विभागाचा मुख्यमंत्र्यांच्या सचिवांच्या घरावर छापा, 9 कोटी जप्त
Income Tax Raids Houses of MP CM Kamal Nath's Aides in Indore and Delhi (Photo Credits: ANI)

मध्य प्रदेश (Madhya Pradesh) चे मुख्यमंत्री कमलनाथ (Kamal Nath) यांचे खासगी सचिव प्रविण कक्कड (Praveen Kakkar) यांच्यासह अजून दोन जणांच्या घरावर, दिल्लीच्या आयकर विभागाने छापा टाकला आहे. यामध्ये आतापर्यंत 9 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. आयकर विभागाने कक्कड आणि राजेंद्र कुमार मिगलानी यांची चौकशी सुरु केली आहे. या प्रकरणामुळे मध्य प्रदेशमध्ये खळबळ माजली आहे. मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास दिल्ली आणि मध्य प्रदेशच्या भोपाळ आणि इंदूरसह सहा ठिकाणी या धाडी टाकण्यात आल्या.

प्रविण कक्कड यांच्या विजयनगरमधील घरावर आयकर विभागाने छापा टाकला. कक्कड यांच्या विजयनगर येथील शो रुम आणि अन्य ठिकाणी देखील छापा टाकण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. कक्कड जेव्हा सेवेत होते तेव्हा त्यांच्या विरुद्ध अनेक प्रकरणाची चौकशी सुरु होती. याशिवाय कमलनाथ यांच्या जवळचे मानले जाणारे राजेंद्र कुमार यांच्या मिगलानी येथील घरावरही आयकर विभागाने छापा टाकला आहे. आयकर विभागातील 15 अधिकाऱ्यांनी हा छापा टाकला आहे. (हेही वाचा: कर्नाटक मधील मंत्री सीएस पुट्टाराजू यांच्या घरावर आयकर विभागाकडून छापेमारी)

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे प्रतीक जोशी यांच्या घरावरही छापेमारी करून रोख रक्कम ताब्यात घेण्यात आली. आयकर विभागाने इंदौर, भोपाळ, गोवा आणि दिल्लीसह जवळपास 50 ठिकाणी हे छापे टाकले आहेत. लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात हवालाच्या मार्गे पैशाची मोठी उलाढाल होणार आहे. अशी माहिती आयकर विभागाला मिळाली, या पार्श्वभूमीवर हे छापे टाकण्यात आले आहेत.