School | Representational Image (Photo Credits: Wikimedia Commons)

Teacher Attacked on Class 5th Student: देशाची राजधानी दिल्लीतून (Delhi) एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शिक्षक हे देवाचे रूप मानले जातात. मात्र, या प्रकरणात शिक्षकांचा क्रूर अवतार दिसून आला. दिल्लीत इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यावर एका शिक्षिकेने कात्रीने हल्ला केला. एवढ्यावरचं ही शिक्षिका थांबली नाही तर तिने मुलीला शाळेच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून फेकले. पोलिसांनी सांगितले की, आरोपी शिक्षिकेला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेनंतर मध्य दिल्लीतील मॉडेल बस्ती भागात असलेल्या प्राथमिक शाळेत लोकांचा मोठा जमाव जमला होता.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, गीता देशवाल या आरोपी शिक्षिकाने विद्यार्थिनीवर छोट्या कात्रीने हल्ला केला आणि नंतर तिला पहिल्या मजल्यावरून खाली फेकले. जखमी विद्यार्थिनीवर हिंदुराव रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विद्यार्थ्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. (हेही वाचा - Karnataka: गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकास विद्यार्थिनींकडून चोप, कर्नाटकातील मंड्या तालुक्यातील घटना)

पोलिस उपायुक्त (मध्य) श्वेता चौहान यांनी सांगितले की, प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाच्या आधारे भारतीय दंड संहितेच्या कलम 307 अंतर्गत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे. आरोपी शिक्षकाला ताब्यात घेण्यात आले आहे. दिल्ली महानगरपालिकेच्या (एमसीडी) एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी शिक्षकाला तत्काळ निलंबित करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

दुसरीकडे, पीडितेने एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, 'प्रथम मला कात्रीने मारण्यात आले आणि त्यांनी (शिक्षिकेने) माझे केस ओढले. त्यानंतर मला शाळेच्या पहिल्या मजल्यावरून खाली फेकले. मी काही चुकीचे केले नव्हते.'