High Court on Corona Protocol in Flight: प्रवाशांनी नियम पाळले नाही तर त्यांना बाहेर काढा; फ्लाइटमधील कोरोना प्रोटोकॉलवर उच्च न्यायालयाचा आदेश
Delhi High Court, Air passengers (PC - PTI and Wikimedia Commons)

High Court on Corona Protocol in Flight: दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणांमध्ये हवाई प्रवाशांसाठी (Air Passengers) मास्क घालण्याच्या कठोर अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. फ्लाइटमध्ये आणि विमानतळांवर कोविड नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल जनहित याचिकांवर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने सांगितले की, जे प्रवाशी नियमांचे पालन करत नाहीत त्यांना विमानतळ किंवा विमानातून बाहेर काढा.

या जनहित याचिकांवर सुनावणी करताना, कार्यवाहक मुख्य न्यायमूर्ती (ACJ) विपिन संघी यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सांगितले की, विमानतळावर नियम लागू केले जावेत आणि विमानात मास्क न घालणाऱ्यांना मोठा दंड ठोठावला जावा. (हेही वाचा - Restaurant Service Charges: रेस्टॉरंटमध्ये जेवण करणाऱ्या ग्राहकांसाठी खुशखबर! सरकारच्या 'या' निर्णयामुळे स्वस्त झाले Lunch-Dinner)

ACJ ने सांगितले की, मास्क अनिवार्य करण्यामागचा उद्देश कोविडचा धोका कमी करणे हा आहे. काही खाताना किंवा पिताना तुम्ही मास्क काढू शकता, असे न्यायालयाने म्हटले आहे. फ्लाइटमध्ये मास्क घालणे आधीच्याचं नियमात आहे.

दरम्यान, या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी तज्ज्ञ नेमण्याचा विचार करावा, अशी विनंती याचिकाकर्त्याने न्यायालयाला केली. याचिकाकर्त्याने पुढे सांगितले की, प्रवासादरम्यान लोक मास्क घालत नाहीत हे त्याच्या लक्षात आले आहे. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नाही. प्रभारी मुख्य न्यायाधीश विपिन सांघी म्हणाले, 'आम्हीही तेच सांगत आहोत. विमानात आणि विमानतळावर मास्क असणे आवश्यक आहे.'