पाकिस्तानचा खोटेपणा उघड; भारतीय वायूसेनेने सादर केले पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडल्याचे पुरावे (Video)
Radar image released by Air Vice Marshal RGK Kapoor | (Photo Credits: ANI)

पुलवामा हल्ल्यानंतर 27 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या एफ-16 (F-16) या विमानाने भारतात घुसखोरी केली होती. हे एफ-16 विमान मिग-21 बिसॉन या विमानानेच पाडल्याचे भारताकडून सांगण्यात आले होते. मात्र पाकिस्तानने ही गोष्ट मान्य केली नाही. आता भारत आणि पाकिस्तानच्या झालेल्या हवाई चकमकीत पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडले गेल्याचे पुरावेच भारतीय हवाई दलाने (Indian Air Force) प्रसिद्ध केले आहे. याआधी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सुरक्षा आणि गोपनियतेच्या कारणामुळे आम्ही याबद्दल अधिक माहिती सांगू शकत नाही, असे भारतीय हवाई दलाकडून सांगण्यात आले होते.

आज, वायु सेनेचे एअर व्हाईस मार्शल आरजीके कपूर (RGK Kapoor) यांनी माध्यमांसमोर एअरबॉर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम (AWACS) रडारने घेतलेली छायाचित्रे प्रसिद्ध केली. यामुळे पाकिस्तान खोटे बोलत असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे. आरजीके कपूर यांनी रडारद्वारे घेण्यात आलेल्या छायाचित्रांचे विश्लेषण करताना सांगितले, यामध्ये लाल रंगामध्ये दिसत असलेली पाकिस्तानची 3 लढावू विमाने आहेत, ती एफ - 16 विमाने आहेत. उजव्या बाजूस निळ्या वर्तुळात अभिनंदन वर्धमान यांचे विमान असल्याची माहिती मिळते. त्यानंतर काही वेळात घेण्यात आलेल्या दुसऱ्या छायाचित्रात एफ-16 विमान दिसत नाही, कारण त्याला नष्ट करण्यात आले होते. (हेही वाचा: तिनही सैन्य दलांच्या पत्रकार परिषदेमध्ये सादर केले पाकिस्तानच्या खोटेपणाचे पुरावे; आता पाकच्या कोणत्याही हल्ल्याचे उत्तर देण्यास तयार)

याबाबत पाकिस्तानने आपण एफ-16 विमानांचा वापर केलाच नव्हता असे सांगितले होते. काही दिवासांपूर्वी पाकिस्तानला दिलेली सगळी F-16 विमाने सुरक्षित आहेत, असे अमेरिकेनेही म्हटले होते. याआधी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये भारतीय हवाई दलाकडून या विमानाचे अवशेष प्रसिद्ध करण्यात आले होते. मात्र आता भारतीय वायुसेनेकडून रडारद्वारे घेण्यात आलेले पुरावे सादर करून पाकिस्तानचा खोटेपणा उघडा पाडण्यात आला आहे.