मध्य प्रदेशातील जबलपूरमधील (Jabalpur) रांझी परिसरात एक वेदनादायक घटना समोर आली आहे. येथे पत्नीचा जीव घेतल्यानंतर पतीनेही गळफास लावून घेतला. कौटुंबिक वादातून घटना घडल्याचे सांगितले जात आहे. दोघांचे चार महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. रांझी पोलिस स्टेशन (Ranzi Police Station) हद्दीतील शारदा नगर भागात राहणाऱ्या तरुणाने पत्नीची निर्घृण हत्या केल्यानंतर गळफास लावून आत्महत्या केली. या खळबळजनक घटनेची माहिती सायंकाळी पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस एफएसएल टीमसह घटनास्थळी पोहोचले. प्राथमिक चौकशी आणि घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पती-पत्नीच्या आपसी भांडणातून ही घटना घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
मात्र अन्य बाबींचाही पोलिस तपास करत आहेत. अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रदीप शेंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शारदा नगर येथील रहिवासी असलेल्या नितेश साहू यांनी सायंकाळी 7 वाजता माहिती दिली होती की, त्यांचा मोठा भाऊ विभोर साहू खोलीत फासावर लटकला होता आणि रितू साहू बाथरूमच्या बाहेर मृतावस्थेत पडल्या होत्या. माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता रितूजवळ रक्ताने माखलेली कात्री आढळून आली. हेही वाचा Shocking! मुलगा ऑनलाईन लुडो खेळत असल्याने पित्याने केली अमानुष मारहाण; मुलाचा मृत्यू, वडिलांना अटक
फासावर लटकलेल्या विभोरच्या हातात रक्ताचे चट्टे आढळून आले. विभोरने कात्रीने रितूची हत्या करून नंतर आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. मृताच्या शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की, दुपारी चार वाजण्याच्या सुमारास विभोर आणि रितू यांच्यात भांडणाचे आवाज येत होते. पण पती-पत्नीमधील भांडणाचे रूपांतर इतक्या मोठ्या घटनेत होईल, असे कोणालाच वाटले नव्हते. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून तपास सुरू केला आहे.
नितेशने पोलिसांना सांगितले की त्याचे वडील निवृत्त कारखान्यात कामगार होते. घरी तो आणि मोठा भाऊ विभोर राहत होते. नितेशच्या म्हणण्यानुसार, या वर्षी फेब्रुवारीमध्ये विभोरचा विवाह कुंडम पडरिया येथील रितू साहूसोबत झाला होता. विभोर येथे भाजीपाला व फळे विकायचे. विभोर आणि रितू यांच्यात लग्न झाल्यापासून वाद होत होते. नितेशच्या म्हणण्यानुसार, विभोर हे गेल्या 15 दिवसांपासून खूप तणावाखाली होते. तो कामावरही जात नव्हता. आईला अनेकदा विचारणा करूनही विभोर यांनी कोणतेही उत्तर दिले नाही.