HMPV Virus (फोटो सौजन्य - X/@DDNewslive)

HMPV Virus: देशात ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) विषाणूचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. आता पुद्दुचेरीमध्ये एका 5 वर्षांच्या मुलीला एचएमपीव्हीची लागण झाली आहे. ताप, खोकला अशी लक्षणे आढळल्यानंतर मुलीची तपासणी केल्यानंतर तिला एचएमपीव्ही झाल्याचे निदान झाले. मात्र, मुलीची प्रकृती सुधारत असून तिला देखरेखीखाली ठेवण्यात आल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, एचएमपीव्ही हा एक जुना विषाणू आहे, जो पहिल्यांदा 2001 मध्ये ओळखला गेला होता. केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा म्हणाले की, हा विषाणू नवीन नाही आणि गेल्या अनेक वर्षांपासून जागतिक स्तरावर पसरत आहे. ते म्हणाले की, हा विषाणू प्रामुख्याने हवेतून पसरतो आणि विशेषत: हिवाळा आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीला सक्रिय असतो.

विशेषत: चीन आणि शेजारच्या देशांमध्ये या विषाणूवर मंत्रालय बारीक लक्ष ठेवून आहे, असेही मंत्री म्हणाले. भारतात एचएमपीव्हीच्या प्रकरणांमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही आणि आरोग्य यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. नड्डा यांनी जनतेला आवाहन केले की, या विषाणूबद्दल घाबरून जाण्याची गरज नाही, कारण आरोग्य विभाग संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. याशिवाय विषाणूचा प्रसार आटोक्यात यावा यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारीची पावले उचलली जात असल्याची खात्री मंत्रालयाने केली आहे.