तेलंगणामध्ये (Telangana) हत्येचे एक अनोखे प्रकरण समोर आले आहे. एका माणसाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी कोंबड्याला ताब्यात घेतलं आहे. तेलंगणातील जगतियाल जिल्ह्यात कोंबड्याने चुकून मालकाची हत्या केली. आता पोलिस या कोंबड्याला न्यायालयात हजर करणार आहेत. मात्र, कोंबडीला खुनाच्या आरोपाखाली अटक केल्याच्या वृत्ताचे पोलिसांनी खंडन केले आहे. या घटनेनंतर संपूर्ण जगतियाल जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, बेकायदेशीर कोंबड्याच्या लढाईदरम्यान, कोंबडीच्या पायाला बांधलेली चाकू चुकून 45 वर्षीय थानुगुल्ला सतीश यांना लागला. 22 फेब्रुवारीला लथुनुर गावात ही घटना घडली. सतीश यांनी बेकायदेशीर कॉक फाइटसाठी कोंबडा आणला होता. परंतु, या घटनेमुळे त्याला आपला जीव गमवावा लागला आहे. (वाचा - Uttar Pradesh: मॉलमध्ये काम करणाऱ्या 30 वर्षीय महिलेचे अपहरण करून नराधमांकडून 3 तास सामूहिक बलात्कार)
माध्यमांच्या वृत्तानुसार, कोंबडीच्या लढाई दरम्यान सतीश कोंबडीच्या पायाला बांधलेल्या चाकूमुळे जखमी झाला. यानंतर सतीशच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. तेलंगणामध्ये कोंबड्याच्या लढाईस बंदी असल्याने लोकांनी छुप्या पद्धतीने गावातील येलम्मा मंदिराजवळ कोंबड्यांची लढाई आयोजित केली होती.
या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित कोंबडा गोलापल्ली पोलिस ठाण्यात आणला. सध्या या कोंबड्याला पोलिस ठाण्यात ठेवण्यात आलं असून पोलिस कर्मचारी त्याची काळजी घेत आहेत. पोलिस स्टेशनमध्ये कोंबड्याच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की, पोलिसांनी कोंबड्याला त्याच्या मालकाच्या हत्येसाठी अटक केली आहे. मात्र, पोलिसांनी या वृत्तास नकार दिला आहे. कोंबड्याला अटक करण्यात आली नाही. तसेच त्याला ताब्यातदेखील घेण्यात आलेलं नाही, अशी माहिती गोलापल्लीचे पोलिस अधिकारी बी जीवन यांनी दिली. कोंबड्याच्या संरक्षणाची जबाबदारी पोलिसांनी घेतली असल्याचंही यावेळी जीवन यांनी सांगितलं आहे.