Rain | Pixabay.com

Heavy Rain In Tamil Nadu: रविवारी उशिरा दक्षिण तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडला. तामिळनाडूमधील कन्याकुमारी, तिरुनेलवेली, थुथुकुडी आणि तेनकासी या चार जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला होता. हवामान कार्यालयाने म्हटले आहे की, सध्या कोमोरिन क्षेत्र आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात चक्रीवादळाचे परिवलन आहे, जे मध्य उष्णकटिबंधीय पातळीपर्यंत पसरलेले आहे. चार जिल्ह्यांमध्ये रविवारी मुसळधार पाऊस झाल्याने अनेक भागात पाणी साचले होते. प्रतिकूल वातावरणामुळे सोमवारी सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या. पुराचे पाणी ट्रेन यार्डांमध्ये आणि रेल्वे रुळांमध्ये गेल्याने अनेक गाड्या पूर्णपणे रद्द किंवा अंशत: रद्द करण्यात आल्या.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, तुतीकोरिन जिल्ह्यातील तिरुचेंदूर येथे सोमवारी पहाटे दीड वाजेपर्यंत तब्बल 606 मिमी पावसाची नोंद झाली. शनिवारपासून (16 डिसेंबर) दक्षिण तामिळनाडूच्या बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे तामिळनाडू सरकारने मंत्र्यांना चार बाधित जिल्ह्यांमध्ये मदत कार्य करण्यासाठी पाठवले आहे. तसेच कोणत्याही पुराच्या इशाऱ्यांना सामोरे जाण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. (हेही वाचा -Pune Heavy Rain and Waterlogging Video: मुसळधार पावसाने पुण्यात पाणीच पाणी; पुणेकरांची दैना, पाहा व्हिडिओ)

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने चार जिल्ह्यांमध्ये मदत कार्याला गती देण्यासाठी आणि सर्व विभागांशी समन्वय साधण्यासाठी चार वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. अन्य चार अधिकाऱ्यांचीही संबंधित कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य सचिव शिवदास मीना यांनी रविवारी चार जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. त्यांनी परिस्थिती हाताळण्यासाठी योग्य प्रतिबंधात्मक पावले उचलण्यास सांगितले. (हेही वाचा - Madhya Pradesh Heavy Rain: मध्य प्रदेशात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, नर्मदा आणि शिप्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडली)

कन्याकुमारी आणि तिरुनेलवेली येथे राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या तीन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. सखल भागात राहणाऱ्या लोकांना सूचना जारी करण्यात आल्या आहेत. खासगी कंपन्यांनाही केवळ अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसह काम करण्यास सांगितले आहे. पेचीपराई, पेरुंजानी आणि पापनासम धरणांमधून अतिरिक्त पाणी सोडण्यात येत असून बाधित जिल्ह्यांतील दोन लाखांहून अधिक लोकांना सतर्कतेचे संदेश (एसएमएस) पाठवण्यात आले आहेत.

पहा व्हिडिओ - 

रेल्वे गाड्या रद्द -

राज्यातील मुसळधार पावसामुळे ट्रॅक आणि रेल्वे यार्डांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्या अर्धवट रद्द करण्यात आल्या आहेत. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री केकेएसएसआर रामचंद्रन यांनी सांगितले की, कन्याकुमारी, तिरुनेलवेली, थूतुकुडी आणि तेनकासी जिल्ह्यांमध्ये 250 राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल तैनात करण्यात आले आहेत.