Jharkhand: हावडा-नवी दिल्ली रेल्वे मार्गावर हृदयद्रावक घटना; निचितपूर गेटवर 25 हजार व्होल्ट वायर अंगावर पडून सहा जणांचा होरपळून मृत्यू
Death | Image only representative purpose (Photo credit: pixabay)

Jharkhand: हावडा-नवी दिल्ली रेल्वे मार्गावर (Howrah-New Delhi Railway Line) सोमवारी एक हृदयद्रावक घटना घडली. धनबाद आणि गोमोह दरम्यान निचितपूरजवळ 25,000 व्होल्ट वायरच्या संपर्कात (High Tension Wire) आल्याने सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला. विजेच्या तारांच्या कचाट्यात येऊन सहा जणांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे या रेल्वे मार्गावरील अप आणि डाऊन गाड्यांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. हावडा-बिकानेर एक्स्प्रेस धनबाद स्थानकावर थांबवण्यात आली आहे. खाली जाणारी कालका-हावडा नेताजी एक्स्प्रेस तेतुलमारी स्थानकावर थांबवण्यात आली. रेल्वे अधिकारी, डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

घटनेच्या प्राथमिक माहितीनुसार, धनबाद रेल्वे विभागातील प्रधानखंटा ते बंधुआ या सुमारे 200 किमी रेल्वे मार्गावर गाड्यांचा वेग ताशी 120 ते 160 किमीपर्यंत वाढविण्याचे काम सुरू आहे. सोमवारी रेल्वेच्या टीआरडी विभागाकडून निचितपूर हॉल्टच्या रेल्वे गेटजवळ खांब बसविण्याचे काम सुरू होते. अशा कामासाठी ट्रॅफिक ब्लॉकची परवानगी आवश्यक असून यासाठी क्रेनची मदत घेतली जाते. (हेही वाचा - Pune: उघड्यावर बसवलेल्या इलेक्ट्रिक डीपीच्या संपर्कात आल्याने 8 वर्षीय मुलीचा विजेचा धक्का, महावितरणच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल)

कंत्राटदार विनापरवानगी कंत्राटी मजुरांना काम करून देत होता. मजूर पोल बसवत असताना 25 हजार व्होल्टच्या हाय टेंशन ओव्हरहेड वायरकडे पोल झुकला. तो हाताळण्याचा प्रयत्न करत असतानाच हाय टेंशन वायरला स्पर्श झाल्याने पाच जणांचा जागीच जळून मृत्यू झाला. या घटनेनंतर घटनास्थळी चेंगराचेंगरी झाली. तसेच ठेकेदाराने घटनास्थळावरून पळून काढला.

घटनास्थळी पोहोचलेले डीआरएम कमल किशोर सिन्हा यांनी सहा जणांच्या मृत्यूला दुजोरा दिला. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितलं. तर दुसरीकडे ट्रॅक्शन पोलजवळील चपळकऱ्यात विद्युत प्रवाह सुरू झाल्याने पाणी भरणाऱ्या मुलीला विजेचा धक्का बसला. तिला बेशुद्ध अवस्थेत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मृतांमध्ये लातेहार, बरवाडीह आणि प्रयागराज येथील कामगारांचा समावेश आहे. ट्रॅक्शन पोल बसवण्यासाठी 22 मजूर आणले होते. या मजुरांना धनबादमधील भुली येथे ठेवण्यात आले होते. या घटनेत मृत्यू झालेल्यांची ओळख पटवली जात आहे. आतापर्यंत लातेहारचे संजय भुईया, प्रयागराजचे सुरेश मिस्त्री आणि पलामूचे गोविंद सिंग आणि नामदेव सिंग यांची ओळख पटली आहे. इतरांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.