Covid-19 Vaccine: एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) एक लाखाहून अधिक कर्मचारी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्यांसाठी लसीकरणाचा (Vaccination) खर्च उचलण्याची घोषणा केली आहे. कोरोना विषाणूचं संक्रमण रोखण्यासाठी दोन अनिवार्य लसींसाठी बँक आपल्या कर्मचाऱ्यांचा खर्च करणार आहे. या संदर्भात एचडीएफसी बँकेचे ग्रुप हेड-एचआर विनय राजदान म्हणाले की, 'आमच्या कार्यालयांमध्ये आणि बँक शाखांमधील कर्मचारी व ग्राहकांना सुरक्षित कामकाजाचे वातावरण मिळावे, यासाठी आम्ही आत्तापर्यंत सर्व शासकीय बंधनकारक मार्गदर्शक सूचनांचे सातत्याने पालन केले आहे. कोरोना काळावधीत आमच्या कर्मचार्यांनी कोट्यवधी ग्राहकांची सेवा करण्यास अनुकरणीय चिकाटी, व्यावसायिकता आणि समर्पण दर्शविले आहे. आमच्या कर्मचार्यांना आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांचा लसीकरणाचा खर्च उचलणे हा आमचा कर्मचार्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे.'
एचडीएफसी बँकेच्या ग्रुप हेड आशिमा भट्ट यांनी सांगितलं की, 'आमच्यासाठी आमचे कर्मचारी फ्रंट लाइन कर्मचार्यांसारखे आहेत. ज्यांनी लॉकडाऊन दरम्यानही बँकिंग सारख्या अत्यावश्यक सेवा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या समर्पणाबद्दल आम्ही त्याचे आभारी आहोत. त्यांच्या आरोग्यासाठी, सुरक्षेसाठी आणि कोविड-19 पासून संरक्षणासाठी आम्ही आमचे कर्मचारी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्यांना लसीचे सुरक्षा चक्र देणार आहोत.' (वाचा - HDFC Bank लघू आणि मध्यम व्यापाऱ्यांना Digital Transactions वर देणार कॅशबॅक; जाणून घ्या, कसा घ्याल या ऑफरचा लाभ?)
एचडीएफसी बँकेने लॉकडाऊन दरम्यान, आरोग्यसेवा पुरवठा करणारे आणि वैद्यकीय व्यावसायिकांशी संबंध ठेवून कर्मचार्यांचे हित सुनिश्चित करण्यासाठी अनेक उपाय योजना राबवल्या. शाखा व कार्यालयांमध्ये कडक सुरक्षा प्रोटोकॉल ठेवण्याव्यतिरिक्त, बँकेने विविध ऑनलाइन उपक्रमांद्वारे आपल्या कर्मचार्यांचे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे मानसिक कल्याण सुनिश्चित करण्याचे काम केले. (वाचा - Coronavirus: कोरोना व्हायरसच्या विरोधात लढण्यासाठी HDFC Group कडून PM Cares Fund साठी 150 कोटींचे योगदान)
दरम्यान, एचडीएफसी बँकेचा शेअर आज 1,600 पातळीवर उघडले. सध्या बँकेचे बाजार भांडवल 8.53 लाख कोटी रुपये आहे. आता एचडीएफसी बँक आपल्या कर्मचाऱ्यांसाठी कोरोना लसीचा खर्च उचलणार आहे. बँकेच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.