Hazaribagh Bus Accident: झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यातील गोरहर पोलीस स्टेशन परिसरात गुरुवारी सकाळी एक प्रवासी बस नियंत्रणाबाहेर जाऊन उलटली. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून 25 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे. मृतांच्या संख्येची अधिकृत पुष्टी सध्या झालेली नाही. तर 25 हून अधिक जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बस कोलकाताहून पाटण्याला जात होती. सकाळी 6.30 च्या सुमारास बसचे नियंत्रण सुटून खड्ड्याजवळ उलटली. बहुतांश प्रवासी झोपले होते. अपघातानंतर आरडाओरडा झाला. आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचले आणि त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.
हजारीबाग येथे भीषण अपघात :
अपघातग्रस्त बसच्या खिडक्या तोडून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर चौघांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. जीटी रोडवर सहा लेनच्या बांधकामासाठी अनेक ठिकाणी माती कापण्यात आली आहे. एका ठिकाणी खड्डे पडल्याने बस लेन बदलताना नियंत्रणाबाहेर जाऊन पलटी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. सहा पदरी रस्त्याच्या कामाची गती अतिशय संथ असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गोरहर ते चौपारणपर्यंत अनेक ठिकाणी अनेक महिन्यांपासून खांबांचे बांधकाम अपूर्ण आहे. अनेक ठिकाणी खड्डे खोदण्यात आले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर सातत्याने अपघात होत आहेत. अपघाताची माहिती मिळताच डीएसपी अजितकुमार विमल, गोरहर पोलीस ठाण्याचे प्रभारी, बरकाठा पोलीस ठाण्याचे प्रभारी यांच्यासह मोठ्या संख्येने फौजफाटा घटनास्थळी पोहोचला. सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे.