
Gujarat Child Trafficking Case: उत्तर गुजरातमधील हिम्मतनगर शहरातील एका सात वर्षीय मुलीच्या बाल तस्करी (Child Trafficking Case)प्रकरणात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी आपल्या मुलीला राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील एका व्यक्तीला पाच महिन्यांपूर्वी 4 लाख रुपयांना विकले होते. पोलिसांनी मुलीची अलवर येथून सुटका करून तिला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहे. साबरकांठा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक (एसपी) विजय पटेल यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले की, त्यांच्यासोबत राहणाऱ्या वडिलांचा पुतण्या दिलीप याच्या 1.6 लाख रुपयांच्या कर्जामुळे मुलीला विकण्यात आले होते.
मुलीच्या खरेदीदाराने करार केला
मुलीच्या वडिलांनी इतर पाच नातेवाइकांसह अलवर येथील रहिवासी उमेद सिंग याच्यासोबत करार केल्याचे तपासात समोर आले आहे. करारानुसार मुलगी मोठी झाल्यावर तिचे लग्न उमेद सिंग यांच्या मुलाशी केले जाईल. एसपी म्हणाले, 'दिलीपने पाच महिन्यांपूर्वी कामाच्या ठिकाणाहून 1.6 लाख रुपयांचे आगाऊ पैसे घेतले होते. तेव्हा मुलीचे वडील जामीनदार म्हणून काम करत होते. मात्र, दिलीप कामावर न जाता घरातून पळून गेला. कर्जदाराने वसुलीसाठी त्यांचे दार ठोठावण्यास सुरुवात केल्यापासून दिलीप बेपत्ता आहे.
मुलीच्या आईने याला जोरदार विरोध केला होता. पण वडिलांनी एकले नाही. “4 लाखांपैकी 1.6 लाख रुपये दिलीपला त्याच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी, 30,000 रुपये करार करण्यासाठी आणि 20,000 रुपये कारचे भाडे म्हणून दिले होते,” उर्वरित १.९० लाख रुपये मुलीच्या वडिलांनी ठेवले होते.' शनिवारी पोलिसांनी या सर्वांना अटक केली. मात्र, मुलीचे वडील आणि अल्पवयीन मुलीला विकत घेणारा उम्मेद सिंग अद्याप फरार आहेत.