भाजप प्रदेश अध्यक्षाचा मुलगा ‘कॉपीबहाद्दर’; सापडल्या तब्बल 27 चिठ्ठ्या
जीतू वाघानी (Photo Credits: Facebook)

भारतात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी माजली आहे. त्यात देशात परीक्षेचेही वातावरण आहे. देशात चालू असलेल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयांच्या परीक्षा कॉपी विरहीत होण्यासाठी प्रशासन झटत आहे. अशात गुजरात भाजपाचे अध्यक्ष जीतू वाघानी (Jitu Vaghani) यांच्या मुलाला परीक्षेत कॉपी करताना पकडले आहे. मीत वाघानी (Meet Vaghani) असे या मुलाचे नाव असून, तो बॅचलर्स ऑफ कॉम्प्युटर अप्लिकेशनच्या (BCA) दुसऱ्या वर्गाची परीक्षा देत होता. मीतच्या या कृत्याने त्याचे वडील सर्वत्र ट्रोल होताना दिसत आहेत.

वाघानी यांचा मुलगा मीतकडे तब्बल 27 चिठ्ठ्या सापडल्या आहेत, यामध्ये विविध प्रश्नांची उत्तरे होती. मीतसह अजून तीन जणांना पकडण्यात आले आहे. याबाबत भावनगर कॉलेजचे प्राचार्य वाटलिया यांनी सांगितले की, ‘आम्ही चार विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले. यामध्ये गुजरात भाजपा अध्यक्ष जीतू वाघानी यांचा मुलगा कोण आहे, याची माहिती आमच्याकडे नाही. या मुलांवर योग्य ती कारवाई होईल.’ (हेही वाचा: विज्ञान-1 नंतर दहावी परीक्षेचा इतिहास विषयाचा पेपर व्हॉटसअ‍ॅपवर फुटला; भिवंडीतील शिकवणी चालकाला अटक)

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार असलेले जीतू वाघानी यांच्याही नावाआधी अभिमानाने ‘चौकीदार’ असे लावले आहे. मात्र चौकीदाराच्य मुलाचे हे कृत्य हास्यास्पद बनले आहे. यावर प्रतिक्रिया देताना वाघानी यांनी सांगितले की, ‘मीतला परिक्षेत कॉपी करताना पकडण्यात आले. त्यावर विद्यापीठ योग्य ती कारवाई करेल.’