Image Used For Representational Purpose only | (Photo Credits: File Photo)

Maharashtra SSC 10th Board Exam 2019: राज्यभरात SSC बोर्डाच्या परीक्षा सुरु असताना प्रश्नपत्रिका फुटीचे सत्र देखील सुरु आहे. विज्ञान-1 या विषयाची प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर आता इतिहासाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना तासभर आधीच मोबाईलवर मिळाली असल्याचे समोर येत आहे. या प्रकरणी भिवंडीतील खाजगी शिकवणी चालकाला अटक करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी देखील व्हॉटसअ‍ॅपवर प्रश्नपत्रिका फुटण्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर या प्रकरणात सहभागी झालेल्या शाळेची परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्यात आली होती. या प्रकरणातून धडा घेत कॉपी आणि पेपरफुटी टाळण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) कडक नियम राबवले होते. तरी देखील पेपरफुटीचे सत्र सुरुच आहे. दहावी परीक्षेचा विज्ञान-१ विषयाचा पेपर फुटला; प्रश्नपत्रिका WhatsApp वर व्हायरल

दहावीच्या विज्ञान-1 ची प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर बुधवारी (20 मार्च) इतिहासाचा पेपरही फुटला असल्याचे समोर आले आहे. बुधवारी 11 वाजता इतिहासाचा पेपर होता. नियमानुसार विद्यार्थ्यांना अर्धा तास आधी म्हणजे 10:30 परीक्षा केंद्रावर पोहचणे अपेक्षित होते. मात्र भिवंडी येथील तीन विद्यार्थ्यांना व्हॉटसअ‍ॅपवर 10:10 मिनिटांनीच प्रश्नपत्रिका मिळाली. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित तीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले असून खाजगी शिकवणी चालकाला अटक केली आहे. आरोपीला 26 मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. इयत्ता दहावी परीक्षेला 1 मार्चपासून सुरुवात, कॉपीचे प्रकार टाळण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक

परीक्षा पुन्हा होणार नाही...

इतिहासाची प्रश्नपत्रिका फुटल्याचे समोर आल्यानंतर पुन्हा परीक्षा होणार, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र प्रश्नपत्रिका फुटली नसल्याने पुन्हा परीक्षा होणार नसल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले आहे. यासंबंधित राज्य मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी सांगितले की, "प्रश्नपत्रिका सापडलेल्या विद्यार्थ्यांची पोलिस चौकशी करत आहेत. तसंच ती प्रश्नपत्रिका अजून किती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचली याचाही तपास सुरु आहे. मात्र या परिस्थितीत पुन्हा परीक्षा घेण्याची आवश्यकता दिसत नाही."

काही दिवसांपूर्वी असाच विज्ञान-1 विषयाचा पेपर परीक्षेच्या तासभर आधी व्हॉट्सअ‍ॅपवर उपलब्ध झाला होता. या प्रकरणी गोविंदप्रसाद शर्मा यांनी भिवंडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास करत एकाला अटक केली आहे.