Mukesh Ambani Sends Oxygen From His Refineries: कोरोनाग्रस्त रुग्णांना मुकेश अंबानी यांच्याकडून मोठी मदत; रुग्णालयांसाठी रिफायनरीमधून पाठवला मोफत ऑक्सिजन
Reliance Industries Limited MD and Chairman Mukesh Ambani | File Image | (Photo Credits: PTI)

Mukesh Ambani Sends Oxygen From His Refineries: देशात कोरोना रुग्णांची (Corona Patients) संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातचं अनेक राज्यांत कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजनची (Oxygen) कमतरता भासत आहे. कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) पुढे आले आहेत. त्यांनी आपल्या रिफायनरीजमध्ये तयार केलेला ऑक्सिजन विनामूल्य रुग्णालयात देण्यास सुरूवात केली आहे.

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडकडे पश्चिम भारतातील जगातील सर्वात मोठे रिफायनिंग कॉम्प्लेक्स आहे. येथून जामनगरहून महाराष्ट्रात मोफत ऑक्सिजन पाठविला जात आहे.

कंपनीच्या एका अधिकाऱ्याने ओळख न सांगण्याच्या अटीवर यासंदर्भात माहिती दिली आहे. कंपनीच्या अंतर्गत धोरणांमुळे त्यांनी आपली ओळख सार्वजनिक करण्यास नकार दिला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी रिलायन्सकडून राज्यात 100 टन ऑक्सिजन मिळणार असल्याचं सांगितलं आहे. (वाचा -ऑक्सिजन बेड, रेमडेसिवीर इंजेक्शनच्या कमतरतेविरोधात नागपूर मधील डॉक्टरांचे 11 एप्रिल रोजी आंदोलन; अद्याप मदत नाही)

सध्या भारतात कोरोना संसर्गाची दुसरी लाट सुरू आहे. या लाटेमुळे राज्य व केंद्र सरकारची व्यवस्था अपुरी असल्याचे सिद्ध होत आहे. बर्‍याच ठिकाणी रूग्णालयात ऑक्सिजन व बेड नसल्यामुळे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. सध्या देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे राज्यात भयानक स्थिती निर्माण झाली आहे. अशात मुकेश अंबानी कोरोना रुग्णांसाठी धावून आले आहेत. त्यामुळे सर्वत्र त्यांचं कौतुक होतं आहे.

दरम्यान, एका अधिकाऱ्याने सांगितले की, रिफायनरीमध्ये तयार होणाऱ्या ऑक्सिजनचा एक भाग रुग्णालयात पाठविला जात आहे. तथापि, कंपनीच्या प्रवक्त्यांनी याबद्दल काहीही बोलण्यास नकार दिला आहे. सध्या मध्य प्रदेश आणि गुजरातसारख्या शेजारच्या राज्यातही ऑक्सिजनची मागणी वाढली आहे.