बिहारमध्ये दारूबंदी झाल्यानंतर, पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणावर दारू गोळा केली होती. मात्र अचानक ही दारू गायब झाल्याची बातमी आली. या घटनेची चौकशी केल्यानंतर चक्क उंदरांनी ही दारू फस्त केली असे पोलिसांनी सांगितले होते. याच धर्तीवर आता उत्तरप्रदेशच्या बरेली येथेही असाच प्रकार घडला आहे. पोलीस स्थानकाच्या परिसरातून चक्क एक हजार लीटर दारु गायब झाली आहे. पोलिस अधिक्षक अभिनंदन सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार ही दारु उंदरांनी प्यायली आहे का या संदर्भातील चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
पोलिसांनी टाकलेल्या छाप्यातून ही दारू प्राप्त झाली होती. छावणी पोलीस स्थानकाच्या आवारात एके ठिकाणी या दारूचा साठा करण्यात आला होता. त्या खोलीच्या बाहेर बंदोबस्तासाठी एक पोलीसही तैनात केलेला होता. दरम्यान छावणी पोलिस स्टेशनचे प्रमुख मोहर्रिर हे त्या अडगळीच्या खोलीत काही कामानिमित्त गेले असता त्यांना ही दारू गायब झाल्याचे आढळले. खोलीतील दारूचे कॅन्स रिकामे होते, आणि कॅन्सच्या बाजूला काही उंदीरही फिरत होते. त्यामुळे ही दारू उंदरांनीच प्यायली असल्याचे सांगितले जात आहे.
छापे टाकून जप्त करण्यात आलेल्या दारूचे काही नमुने घेऊन, ती दारू नष्ट करण्यात येते. अशा प्रकारे गेल्या दशकभरातील दारू या खोलीत साठवण्यात आली होती, मात्र पोलिसांनी ती वेळीच का नष्ट केली नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात आपण वरिष्ठांना पत्र लिहून ही गोष्ट कळवले असल्याचे सिंग यांनी सांगितले, मात्र याबाबत अजून कोणतेही उत्तर मिळाले नाही.