'गली-गली में शोर है, हिंदुस्तान का चौकीदार चोर है'; राहुल गांधींचा जबरदस्त वार
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (संग्रहीत आणि संपादित प्रतिमा)

'संपूर्ण देशातून आवाज उठतो आहे, गली-गली में शोर है, हिंदुस्तान का चौकीदार चोर है', अशा तीव्र शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला आहे. राजस्थान येथील डूंगारपूरच्या सगवाडा येथे सभेला संबोधीत करताना ते बोलत होते. आगामी काळात राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे राजस्थानमधील राजकीय हवा आता चांगलीच तापू लागली आहे. दरम्यान, या वेळी बोलताना राहुल गांधी यांनी अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यात कोणतेही मतभेद नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. तसेच, विधानसभा निवडणुकीत पॅरेशूटबाज नेत्यांना (लादलेल्या) तिकीट मिळणार नाही. तर, प्रत्यक्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यालाच तिकीट मिळेल. आपला उमेदवार कोण असावा हेसुद्धा कार्यकर्ताच ठरवेल असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

'मेड इन राजस्थान आणि मेड इन डूंगारपूर'

सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, गौरव यात्रा काढण्यासाठी खर्च होणारा पैसा हा जनतेच्या खिशातला आहे. पुढे राहुल यांनी स्थानिक उद्योगाला चालना देण्याचे अश्वासन दिले. ते म्हणाले, आमचे स्वप्न आहे की, एक दिवस तुम्ही मोबाईलच्या पाठिमागे पाहाल तर, त्यावर मेड इन राजस्थान आणि मेड इन डूंगारपूर लिहिलेले पहायला मिळेल. आगामी निवडणुकीत महिलांनी जास्तित जास्त सहभाग घ्यावा. महिलांच्या सहभागाशिवाय भारतात काहीच होऊ शकत नाही, असेही राहुल गांधी म्हणाले.

अर्थमंत्र्यांची भेट घेऊन माल्या देशाबाहेर पळाला

आपल्या भाषणात राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा विजय मल्या प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. राहुल म्हणाले, जर ९००० कोटी रुपयांची चोरी करून माल्या देशाबाहेर पळाला. पण, त्यापूर्वी त्याने अर्थमंत्र्यांची भेट घेतली. हे मी नाही बोलत स्वत: अरुण जेटलीच म्हणाले आहेत, माल्या त्यांना भेटून गेला आहे. त्याने हेही सांगितले की, तो लंडनला जातोय म्हणून.