
झारखंडच्या (Jharkhand) पश्चिम सिंहभूम जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यातील हातगामहरिया पोलीस ठाण्याच्या परिसरातील केनपोसी गावात एकाच कुटुंबातील चार जणांची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली आहे. मृतांमध्ये सहा वर्षांच्या चिमुकल्याचाही समावेश आहे. संपूर्ण कुटुंबाची हत्या केल्यानंतर गुन्हेगार गावातून पळून गेले. कुटुंबातील सर्व सदस्यांचे मृतदेह गावापासून काही अंतरावर सापडले आहेत. सकाळी गावकऱ्यांनी शेतात चौघांचे मृतदेह पाहिले. त्यानंतर गावात एकच खळबळ माजली. या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
ओनमुनी खंडैत (26), त्यांची पत्नी मणि खंडैत (22), त्यांचा मुलगा मुगरू खंडैत (6) आणि भाऊ गोब्रो खंडैत (22) अशी मृतांची नावे आहेत. हे सर्वजण केनपोसी गावातील रहिवाशी आहेत. या सर्वांची कुऱ्हाडीने हल्ला करून हत्या करण्यात आली आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, घटनास्थळावरून पोलिसांना कोणतेही शस्त्र सापडलेले नाहीत. हे देखील वाचा-Karnataka Murder Case: शिवमोग्गा जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नी आणि मुलांनी केला बापाचा खून, 5 जण अटकेत
या घटनेनंतर संपूर्ण गावात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, पोलिसांनी सर्वांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवले आहेत. या हत्येमागचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून पोलिसांचा तपास सुरु आहे.