65 वर्षीय माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर; जाणून घ्या कोण आहे त्यांची होणारी पत्नी
Former Solicitor General Harish Salve (PC - ANI)

माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे (Former Solicitor General Harish Salve) पुढील आठवड्यात पुन्हा एकदा लग्नगाठ बांधणार आहेत. हरीश साळवे हे देशातील नामांकित वकील आणि ब्रिटनमधील क्वीन्स कौन्सिल आहेत. 65 वर्षीय साळवे यांनी गेल्या महिन्यात आपल्या पत्नी मीनाक्षी साळवेपासून कायदेशीररित्या घटस्फोट घेतला आहे. त्यांनी मीनाक्षी यांच्यासोबतचा 38 वर्षांचा संसार मोडला आहे. हरीश साळवे आणि मीनाक्षी यांना दोन मुली आहेत. हरीश साळवे 28 ऑक्टोबर रोजी लंडनच्या चर्चमध्ये आपली मैत्रिण कॅरोलिन ब्रॉसर्ड शी लग्न करणार आहे. हरीश साळवे आणि कॅरोलिन ब्रॉसर्ड या दोघांचेही हे दुसरे लग्न आहे. साळवे यांनी धर्मांतर करून ख्रिस्ती धर्म स्विकारला आहे. मागील दोन वर्षांपासून ते आपल्या भावी पत्नी कॅरोलीनसह नियमित लंडनमधील चर्चमध्ये जात आहेत. हरीश साळवे आणि कॅरोलिन दोघांचे हे दुसरे लग्न आहे. या दोघांनाही पूर्वीच्या जोडीदारापासून मुलं आहेत. कॅरोलिन, व्यवसायाने एक कलाकार असून तिला एक मुलगी आहे. कॅरोलिन 56 वर्षांची आहे. हरीश साळवे यांची कला प्रदर्शनात कॅरोलिनशी भेट झाली. त्यानंतर या दोघांमधील नात अधिक घट्ट झालं. (हेही वाचा - Coronavirus in India: भारतासाठी दिलासादायक बाब; देशाचा कोरोना व्हायरस Recovery Rate पोहोचला 90 टक्क्यांवर, तर मृत्युदर 1.51 टक्के)

दरम्यान, सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे आणि साळवे दोघेही एकाच शाळेत शिकले आहेत. दोघांनी महाराष्ट्रातील नागपूर शहरात शिक्षण घेतलेले आहे. 1976 मध्ये साळवे दिल्ली आणि बोबडे मुंबई उच्च न्यायालयात आले. नंतर बोबडे हे हायकोर्टाचे न्यायाधीश झाले तर साळवेचे वरिष्ठ वकील आणि त्यानंतर सॉलिसिटर जनरल बनले.

हरीश साळवे हे सुरुवातीपासूनचं त्यांच्या कौशल्यामुळे प्रख्यात वकील बनले. त्यामुळेचं भारत सरकारने त्यांची सॉलिसिटर जनरल म्हणून नेमणूक केली. साळवे यांनी कुलभूषण जाधव यांच्यासह इतर अनेक आंतरराष्ट्रीय बाबींमध्ये भारत सरकारची बाजू मांडली. याशिवाय स्वर्गीय सुषमा स्वराज यांच्या विनंतीवरून त्यांनी या खटल्याची सुनावणी करण्यासाठी केवळ एक रुपया शुल्क आकारले होते. देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि व्होडाफोन, रिलायन्स, मुकेश अंबानी, रतन टाटा या सर्व मोठ्या नावांच्या कायदेशीर खटल्यांचेही साळवे यांनी प्रतिनिधित्व केले आहे.