माधव सिंह सोलंकी (Photo Credits: Twitter)

Madhavsinh Singh Solanki Dies: गुजरातचे माजी मुख्यमंत्री माधव सिंह सोलंकी (Madhav Singh Solanki) यांचे निधन झाले आहे. सोलंकी हे कॉंग्रेसचे कट्टर नेते होते. सोलंकी यांनी चार वेळा गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. सोलंकी हे कॉंग्रेस पक्षातील एक मोठे नेते मानले जात होते. सोलंकी यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री पदही सांभाळले होते. शनिवारी वयाच्या 94 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. सोलंकी हे KHAM थिअरीचे जनक मानले जात होते. या जातीच्या समीकरणाच्या जोरावर त्यांनी सत्ता मिळविली होती.

क्षत्रिय समाजातील सोलंकी हे पेशाने वकील होते. त्यांचा जन्म 30 जुलै 1927 रोजी झाला होता. 1977 मध्ये त्यांची प्रथमचं मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली. यानंतर 1980 च्या निवडणुकीत त्यांनी प्रचंड बहुमत मिळवले. सोलंकीने 1981 मध्ये सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांसाठी आरक्षण लागू केले. (जम्मू-कश्मीर: नवजात बालक आणि मातेला घरी सुखरुप पोहचवण्यासाठी जवानाची बर्फाच्छादित रस्त्यावरुन 3.5 किमी ची पायपीट (See Pics))

माधवसिंग सोलंकी यांनी आरक्षण लागू करण्यापूर्वी KHAM फॉर्म्युला लागू केला होता. म्हणून त्यांना KHAM संबंधित जातींचे पाठबळ मिळाले. परंतु, त्यांना ब्राह्मण, बनिया यासारख्या जातींच्या विरोधाचा सामना करावा लागला. यावरून राज्यात खळबळ उडाली होती. तसेच या प्रकरणावरून राज्यात मोठी हिंसा घडली होती.

राज्यात हिंसाचारानंतर सोलंकी यांनी 1985 मध्ये राजीनामा दिला होता. परंतु, पुढील विधानसभा निवडणुकीत, KHAM फॉर्म्युलाच्या जोरावर त्यांनी मोठ्या मतांनी निवडणूक जिंकली होती. दरम्यान,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माधव सिंह सोलंकी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, "माधव सिंह सोलंकी जी अनेक दशकांपासून गुजरातच्या राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे एक प्रबळ नेते होते. समाजासाठी केलेल्या विपुल सेवेबद्दल त्यांची आठवण होईल. त्यांच्या निधनाने मला दु:ख झालं. त्यांचा मुलगा भरत सोलंकी यांच्याशी बोललो आणि सद्भावना व्यक्त केल्या. ओम शांती."