भारतीय बाजारात सध्या फक्त दोनच ई-कॉमर्स कंपन्यांचे वर्चस्व आहे. त्यातील एक म्हणजे फ्लिपकार्ट. तरी फ्लिपकार्टचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बिन्नी बन्सल यांनी तडकाफडकी पदाचा राजीनामा दिला आहे. बिन्नी बन्सल यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. वॉलमार्टने एका निवेदनाद्वारे याची माहिती दिली आहे. मात्र संचालक मंडळातील त्यांचे स्थान कायम राहणार का नाही याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
Flipkart Group CEO Binny Bansal resigns after misconduct probe, reports Reuters pic.twitter.com/XB5kUTp5H2
— ANI (@ANI) November 13, 2018
बिन्नी बन्सल आणि सचिन बन्सल या दोघांनी फ्लिपकार्टची स्थापना केली होती. फ्लिपकार्टची वाढती लोकप्रियता पाहून अमेरिकन कंपनी वॉलमार्टने फ्लिपकार्ट विकत घेतले होते. या खरेदी प्रक्रीयेवेळीच सचिन बन्सल यांनी आपला राजीमाना दिला होता. आता फक्त सहा महिन्यांतच बिन्नी बन्सल यांनीदेखील आपला राजीनामा सुपूर्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बन्सल यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गैरवर्तणुकीचे आरोप झाले होते. याबाबत फ्लिपकार्ट आणि वॉलमार्ट यांच्याकडून स्वतंत्रपणे चौकशी करण्यात आली. त्यानंतर आता बिन्नी बन्सल यांनी फ्लिपकार्ट समूहाच्या सीईओपदाचा राजीनामा दिला आहे.
गेल्यावर्षी वॉलमार्टने फ्लिपकार्ट कंपनीचे 77 टक्के शेअर्स विकत घेतले होते, मात्र तरी नंतरचे अनेक निर्णय घेताना बिन्नी यांनी पारदर्शकता ठेवली नाही, तसेच अनेक निर्णय घेताना नियमांचे उल्लंघन केले असे वॉलमार्टचे म्हणणे आहे.