व्हिडीओ : असे दिसते वादंग माजवणारे 'राफेल विमान'; लवकरच होईल भारतीय वायुसेनेते दाखल
राफेल विमानाचा फर्स्ट लूक (Photo Credits: ANI)

ज्या राफेल विमानाबाबत देशात इतका गदारोळ माजला आहे, अशा राफेलचा ‘फर्स्ट लूक’ नुकताच समोर आला आहे. लवकरच फ्रान्सच्या डसॉल्ट कंपनीकडून ही विमाने खरेदी केली जातील. ही विमाने भारतीय वायुसेनेच्या आर्सेनलमध्ये दाखल होणार आहेत. भारत फ्रान्सकडून 36 राफेल विमान खरेदी करणार आहे. हे विमान उच्च दर्जाचे लढाऊ विमान असल्याचे म्हटले जाते. विशेष म्हणजे या विमानांची बांधणी भारतातच होणार आहे. यासाठी डसॉल्ट एव्हिएशन आणि भारतातील रिलायन्स यामंध्ये करारदेखील झाला आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून या राफेल विमानांमुळे भारतीय राजकारण ढवळून निघाले होते. शाब्दिक चकमकीसोबत मोदी सरकारवर अनेक आरोपही करण्यात आले. डसॉल्ट एव्हिएशनसोबत करार करण्यासाठी भारतानेच रिलायन्सचे नाव सुचवले असे विरोधी पक्षाचे म्हणणे होते. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर डसॉल्ट एव्हिएशन कंपनीचे सीईओ एरिक ट्रॅपिअर यांनी रिलायन्सची निवड आम्ही स्वतः केली असून, या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.

सोमवारी राफेल लढाऊ विमानांच्या व्यवहारांबाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे शपथपत्र सादर केले आहे. यात राफेल व्यवहारांबाबतची निर्णय प्रक्रिया तसेच, भारतीय भागीदारांची निवड प्रक्रिया आदींबाबत माहिती देण्यात आली आहे. आता या सर्व गोष्टींची पडताळणी केल्यानंतर सर्वोच्च न्यायालय यावर काय निर्णय घेईल ते पाहणे महत्वाचे ठरणार  आहे.