Asaduddin Owaisi, Swami Yati Narasimhananda (PC - PTI, FB)

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांना कथित प्रक्षोभक वक्तव्य करणे महागात पडले आहे. ओवेसींच्या या वक्तव्याबाबत दिल्ली पोलिसांच्या IFSO टीमने त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे. या एफआयआरमध्ये स्वामी यती नरसिंहानंद (Swami Yati Narasimhananda) यांचेही नाव आहे.

प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल दिल्ली पोलिसांनी भाजपचे माजी नेत्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावरही आज कारवाई केली आहे. एका विशिष्ट समुदायाविरुद्ध भडकाऊ वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिसांनी आज अनेक लोकांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे की, द्वेषपूर्ण संदेशाने गटांना भडकावण्याचा आणि हानिकारक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. (हेही वाचा - Prophet Muhammad Row: नुपूर शर्मा, सबा नकवी आणि नवीन जिंदाल यांच्यासह 9 जणांविरोधात सोशल मीडियावर द्वेष पसरवल्या प्रकरणी गुन्हा दाखल)

याआधी 9 जणांविरोधात एफआयआर - 

सोशल मीडियावर खोटे बोलणे आणि प्रक्षोभक विधाने करणाऱ्यांवर दिल्ली पोलीस आता कडक कारवाई करत आहेत. नुपूर शर्मा, नवीन कुमार जिंदाल, मौलाना मुफ्ती नदीम, अब्दुर रहमान, शादाब चौहान, सबा नक्वी, गुलजार अन्सारी, अनिल कुमार मीना आणि पूजा शकुन यांची नावे या अंतर्गत नोंदवलेल्या एफआयआरमध्ये समाविष्ट आहेत.

सोशल मीडिया संस्थांवरही गुन्हा दाखल -

प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप नेत्या नुपूर शर्मा व्यतिरिक्त पोलिसांनी अनेकांवर कारवाई केली आहे. या प्रकरणी अनेक सोशल मीडिया संस्थांविरोधात एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. नुपूर शर्मा आणि भाजपचे माजी नेते नवीन जिंदाल यांच्या कथित प्रक्षोभक वक्तव्यानंतर अनेक आखाती देशांनी निषेध केला होता. त्यानंतर भाजपने दोन्ही नेत्यांना निलंबित केले होते. भाजपने सर्व धर्मांचा आदर करतो आणि त्यामुळेच या नेत्यांवर पंथ किंवा धर्माचा अपमान केल्याप्रकरणी कारवाई केल्याचे म्हटले आहे.

नुपूर शर्माच्या वक्तव्यावरून नव्या वादाला सुरुवात झाली. एका व्हायरल व्हिडिओमध्ये दावा करण्यात आला होता की, नुपूरने एका टीव्ही शोमध्ये ज्ञानवापी मशिदीवरील चर्चेदरम्यान प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केली होती. यानंतर नुपूरला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या होत्या.