Google CEO सुंदर पिचाई यांच्यासह 18 जणांविरोधात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण? घ्या जाणून
Sundar Pichai (Photo Credit: twitter)

गूगलचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई (Sundar Pichai), गायक विशाल गाझिपुरी आणि सपना बौद्ध यांच्यासह 18 जणांविरूद्ध भेलपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण पंतप्रधान नरेंद्र मोदींविरूद्ध (Narendra Modi) बेताल वक्तव्य केल्या संबंधित आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. आरोपींवर धमकी देणे, कट रचणे या कलमांसह आयटी अ‍ॅक्टमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुंदर पिचाईवरील धमकी प्रकरणाशी संबंधित एक पोस्ट ते यु ट्यूबवरून न काढण्याशी संबंधित आहे.

भेलपूर परिसरातील गौरीगंज येथे राहणाऱ्या गिरिजा शंकर जयस्वाल नावाच्या व्यक्तीने तक्रार दिली आहे. या तक्रारीत त्यांनी सांगितले की, त्यांना व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून एक व्हिडिओ प्राप्त झाला होता. या व्हिडिओमध्ये गायकपूरच्या विशनपुरा येथे राहणारी गायक विशाल सिंग उर्फ ​​गाझिपुरी आणि त्यांची पत्नी सपना बौद्ध यांच्यासह बरेच लोक गाताना दिसत आहेत. यात त्यांनी पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह भाष्य केल्याचे त्याने म्हटले आहे. हे देखील वाचा- Fake Accounts वर बंदी घालणे आवश्यक; भारत सरकारची Twitter ला सूचना

व्हिडिओमध्ये पंतप्रधानांबद्दल देशाला विकण्यासारखे बेताल वक्तव्य केले जात आहे. त्यानंतर गिरिजा शंकर यांनी विशाल गाजीपुरीला फोन करून यावर आक्षेप घेतला. दरम्यान, विशाल यांनी जीवे मारण्याची धमकी देण्याच्या आरोपाखाली गिरिजा शंकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. एवढेच नव्हेतर, त्याचा मोबाईल क्रमांक युट्यूबवर टाकला. त्यानंतर विशालच्या चाहत्यांकडून गिरिजा शंकर यांना धमकीची फोन येण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत गिरिजा शंकर यांना 8 हजार 500 पेक्षा जास्त धमकीचे कॉल आले आहेत. याबाबत गिरिजा शंकर यांनी पोलिसांत तक्रार दिली. कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी कोर्टाचा आश्रय घेतला. कोर्टाच्या आदेशानुसार पोलिसांनी या लोकांवर कलम 504, 506, 500, 120 (ब) 67 आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.