Shahjahanpur Road Accident: शाहजहांपूर (Shahjahanpur) च्या खुटार पोलीस स्टेशन परिसरात बसवर ट्रक उलटल्याने 11 जणांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत. हे सर्व लोक इतर साथीदारांसह सीतापूरहून पूर्णागिरी (उत्तराखंड) येथे खासगी बसने जात होते. शनिवारी रात्री 12.15 वाजता जेवण व अल्पोपाहारासाठी एका ढाब्यावर थांबले असता भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकची धडक बसून बस उलटली. रात्री एक वाजेपर्यंत ट्रकखालून सात मृतदेह बाहेर काढण्यात आले.
25 जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू -
25 जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्री दोन वाजेपर्यंत मदतकार्य सुरूच होते. बसमध्ये 40 हून अधिक भाविक असण्याचा अंदाज आहे. उत्तराखंडमधील पूर्णागिरी येथे देवी मातेचा दरबार आहे. तेथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी जातात. शनिवारी रात्री हे भाविक खासगी बसने सीतापूर येथील सिंदौलीकडे रवाना झाला. (हेही वाचा -Rajkot Gaming Zone Fire: राजकोटच्या TRP Mall च्या गेमिंग झोनमध्ये भीषण आग; 20 हून अधिक लोकांच्या मृत्यूची शक्यता, बचावकार्य सुरु (Video))
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस गोला मार्गे खुटार येथे पोहोचली होती. तेथे ड्रायव्हरने अल्पोपाहार आणि जेवणासाठी बस एका ढाब्याच्या बाहेर उभी केली. काही भाविक ढाब्याच्या आत गेले होते, काही बसमध्ये बसून राहिले तर बाकीचे इकडे तिकडे फिरत होते. त्याचवेळी भरधाव वेगात निघालेल्या डंपरचे नियंत्रण सुटले आणि ढाब्याच्या बाहेर उभ्या असलेल्या बसला धडकल्यानंतर तो तेथेच उलटला. डंपरची धडक एवढी भीषण होती की बसचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला.
काही भाविक डंपरखाली गाडले गेले. हा अपघात पाहून ढाब्यावर बसलेल्या भाविकांमध्ये गोंधळ उडाला. ढाब्याचे कर्मचारी मदतीसाठी धावले मात्र अपघातस्थळी असलेले दृश्य भयावह होते. डंपरमधील खडी सर्वत्र पसरल्याने मदतकार्य सुरू होऊ शकले नाही. दरम्यान, पोलिसांना फोन करून बोलावण्यात आले. क्रेन आणि बॅकहो लोडरची तातडीने व्यवस्था करण्यात आली.
या अपघातात सिंधौली, सीतापूर येथील रहिवासी अजित, सुमन देवी, आशिष, मुन्नी, शिवशंकर आणि सीमा यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर सीतापूरमधील कमलापूर येथील रहिवासी असलेल्या स्वानमती आणि दोन अनोळखी व्यक्तींचा रुग्णालयात मृत्यू झाला. सरस्वती, रिता, मिष्टी, बिट्टो, गीता यांच्यासह 25 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. डंपरखालून एका भाविकाला जिवंत बाहेर काढण्यात आले. त्यांची प्रकृतीही चिंताजनक आहे.
पहा व्हिडिओ -
#WATCH | UP: 11 people died and 10 injured after a truck turned turtle on top of a bus in Khutar PS area of Shahjahanpur. pic.twitter.com/LnlXU1UPIU
— ANI (@ANI) May 25, 2024
एसपी अशोक कुमार मीना यांनी सांगितले की, बसमध्ये प्रवास करणारे लोक आपल्या कुटुंबासह पूर्णागिरीला जात होते. मृत व्यक्ती वेगवेगळ्या कुटुंबातील आहेत, मात्र जखमींमध्ये एकमेकांच्या नातेवाईकांचा समावेश आहे. जखमींची प्रकृती सुधारल्यानंतर बसमध्ये किती जण प्रवास करत होते हे स्पष्ट होईल. पोलिस ठाण्यामार्फत बसमालकालाही माहिती देण्यात येत आहे.