महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक रणजितसिंह डिसले यांचे नाव आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. मुलींच्या शिक्षणामध्ये महत्वाची भूमिका बजावल्याने आणि क्यूआर कोडेड पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून शिक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी त्यांना डिसेंबर 2020 मध्ये ग्लोबल टीचर पुरस्कार प्राप्त झाला होता. आता रणजितसिंह डिसले यांच्या माध्यमातून राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये ‘शिक्षक प्रेरणा कार्यशाळा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली. डिसले यांच्या कार्यातून सर्व शिक्षकांना प्रेरणा मिळावी तसेच शिक्षणातील आधुनिक तंत्रज्ञानाचा सर्वांना परिचय व्हावा हा या कार्यशाळेमागील हेतू आहे.
डिसले हे 2009 पासून प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत आहेत विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान आणि क्यूआर कोडच्या सहाय्याने शिकवण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन, शिकवण्याचे नवे तंत्र विकसित केले आहे. त्यांना युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या गेलेल्या पुरस्काराची रक्कम 7 कोटी रुपये इतकी आहे. डिसले हे व्हर्च्युअल फिल्ड ट्रिप या आगळ्या वेगळ्या शैक्षणिक उपक्रमाच्या माध्यमातून जगभरातील 143 हून अधिक देशातील 1400 पेक्षा जास्त शाळांतील मुलांना शिकविण्याचे काम करीत आहेत.
राज्यातील इतर शिक्षकांनाही श्री. डिसले यांच्या कामाची ओळख व्हावी, तसेच शिक्षकांना प्रेरणा मिळावी यासाठी ‘शिक्षक प्रेरणा कार्यशाळा’ हा उपक्रम सुरु करण्याचे शासनाने ठरविले आहे. या कार्यशाळांच्या माध्यमातून राज्यातील शिक्षकांना नवा आत्मविश्वास मिळून ते अधिक जोमाने काम करतील, त्याचप्रमाणे सरकारी शाळांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलण्यास मदत होईल, असा विश्वास मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला. (हेही वाचा: शालेय शुल्क कमी किंवा माफ करण्याच्या निर्णयामध्ये सध्या तरी हस्तक्षेप करू शकणार नाही; शालेय शिक्षण विभागाची महत्वाची माहिती)
या उपक्रमाच्या माध्यमातून डिसले यांनी जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक प्रभावी शिक्षण देण्याबाबत मार्गदर्शन करावे, तसेच त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन राज्यातील सर्व शाळांनी शिक्षणविषयक नवनवीन उपक्रम राबवावेत, असे आवाहन मंत्री श्री. मुश्रीफ यांनी केले आहे.