खुशखबर! एकाचवेळी अनेक पदव्या प्राप्त करण्याची संधी लवकरच उपलब्ध होणार; विचारविनिमय करण्यासाठी यूजीसीने नेमली समिती

सध्याच्या शिक्षणमंडळाच्या नियमानुसार एकाच विद्यापीठातून दोन पदव्या (Bachelor's Degree) एकाचवेळी करता येत नाहीत. एक पदवी आणि एक पदविका मात्र करता येते. याच नियमामध्ये बदल करण्याचा प्रयत्न मंडळ करत आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना एकाचवेळी अनेक पदव्या प्राप्त करता येतील. विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी)ने याबाबत सकारात्मक पावले उचलत एक समिती नेमली आहे. ही समिती एकाचवेळी दोन अथवा अनेक पदव्या प्राप्त करण्याच्या विषयाचे अध्ययन करणार आहे. भूषण पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली ही समिती कार्य करेल.

एक पदवी प्राप्त करत असताना विद्यार्थ्यांना अतिरिक्त शिक्षण घेण्याची इच्छा असते, मात्र सध्याच्या नियमानुसार ते शक्य नाही. याआधी 2012 साली हैद्राबाद विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली अशी समिती नेमण्यात आली होती. त्यावेळी विद्यार्थ्यांना अशाप्रकारे एकाचवेळी दोन पदव्या घेण्याची परवानगी देऊ नये, मात्र ते पदवी आणि पदविका एकाचवेळी करू शकतात असे त्यांनी सांगितले होते. आता यूजीसीने ऑनलाईन शिक्षण पद्धतीला मान्यता दिल्याने द्विपदवीचा मुद्दा पुन्हा एकदा जोर धरू लागला आहे. (हेही वाचा: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात नोकरीच्या विविध संधी; जाणून घ्या पदे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर माहिती)

या नव्या समितीचा आतापर्यंत दोन बैठका पार पडल्या असून, अनेक तज्ञांद्वारे विचारविनिमय केला जात आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धती सुरु झाल्याने, जे लोक काम करत करत शिक्षण घेत आहेत किंवा एकाच क्षेत्रातील दोन वेगवेगळ्या पदव्या ज्यांना हव्या आहेत त्यांच्यासाठी ही सुविधा फायद्याची ठरणार आहे. आता याबाबत यूजीसी काय निर्णय घेईल ते लवकरच समजेल.