मुंबई मध्ये पुन्हा कोरोना रूग्ण संख्येमध्ये वाढ होत असल्याने आता यंदाच्या मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा देखील ऑनलाईन घेण्याचा निर्णय झाला आहे. त्याबाबतचे नोटीफिकेशन नुकतेच जारी करण्यात आले आहे. काल (24 मार्च) मुंबई विद्यापीठाकडून परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यंदा अंतिम वर्षाच्या आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्सच्या सहाव्या सेमिस्टरचे वेळापत्रक जारी करताना त्या 6 ते 21 मे दरम्यान ऑनलाईन माध्यमातून घेतली जाईल असे म्हटलं आहे. तर कॉलेज कडून पहिल्या आणि दुसर्या वर्षाच्या परीक्षा यंदा 15 एप्रिल ते 5 मे दरम्यान पूर्ण करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
मुंबई विद्यापीठ लवकरच लॉ, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सच्या परीक्षांचे देखील वेळापत्रक जारी केले जाणार आहे. (नक्की वाचा: Nagpur University Winter Session Exams 2021: नागपूर विद्यापीठाच्या यंदा हिवाळी सत्राच्या परीक्षा 25 मार्च पासून ऑनलाईन)
MU उन्हाळी सत्र वेळापत्रक Arts, Commerce आणि Science UG कोर्स साठी
-Semester 6 लेखी परीक्षा : 6 ते 21 मे 2021
-Semester 1 ते 4 लेखी परीक्षा : 15 एप्रिल ते 5 मे
-Semester 5 बॅकलॉग परीक्षा: 24 मे ते 2 जून
-Semester 6 प्रॅक्टिकल परीक्षा : 5-15 एप्रिल
परीक्षेचं स्वरूप
मुंबई विद्यापीठाच्या डिसेंबर 2020 मध्ये झालेल्या हिवाळी सत्राच्या परीक्षांप्रमाणेच आता उन्हाळी सत्रातही घेतल्या जातील. मात्र मागील सत्राप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रश्न निवडीचा पर्याय नसेल. मागील सत्रात तासाभराच्या प्रश्नावलीत 50 पैकी 40 बहुपर्यायी प्रश्न सोडवण्याचा पर्याय होता. मात्र आता 60 पैकी 50 गुणांसाठी सार्या 50 प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत.
दरवर्षी मार्च महिन्यात परीक्षा होतात पण यंदा कोरोना संकटामुळे विद्यार्थ्यांचं सत्र महिना, दीड महिना उशिरा सुरू झाल्याने आता परीक्षा मे महिन्यात पुढे गेली आहे. यंदा आधीच विद्यापीठाने परीक्षा ऑनलाईन घेणार असल्याचं सांगितल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम नसेल असा विश्वास देखील विद्यापीठाकडून वर्तवण्यात आला आहे.