MPSC Exam: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने परीक्षा पुढे ढकलल्या
Exam | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) द्वारे घेतल्या जाणाऱ्या परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षा येत्या 13 सप्टेंबरला होणार होत्या. मात्र, याच दिवशी देशभरात नीट परीक्षा (NEET Exam) होणार आहेत. त्यामुळे राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) घेतला आहे. एमपीएससीने अधिकृतरित्या काढलेल्या पत्रकात याबाबत माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, काही प्रशासकीय कारणांमुळे राज्य लोकसेवा आयोजित सेवा पूर्व परीक्षा 20 सप्टेंबर या दिवशी घेण्यात येतील असेही एमपीएससीने आपल्या पत्रकात म्हटले आहे.

राज्यासह देशभरात सध्या कोरोना व्हायरस संकट आहे. त्यामुळे देशासह राज्यातही लॉकडाऊन लागू करण्यात आला. कोरोना व्हायरस संसर्गाची भीती विचारात घेऊन या आधी राज्य लोकसेवा आयोगाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय तीन वेळा घेतला आहे. त्यामुळे स्थगित करण्यात आलेल्या परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक एमपीएससीने 17 जून रोजी जाहीर केले. त्यानुसार पूर्व परीक्षा 13 सप्टेंबर, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 11 ऑक्टोबर आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा एक नोव्हेंबर अशा क्रमाने पार पडणार होत्या. मात्र, 13 सप्टेंबर रोजी संपूर्ण देशात नीट परीक्षा येत्या 13 सप्टेंबरला पार पडत आहेत. परिणामी दोन्ही परीक्षा एकाच दिवशी घेणे टाळण्यासाठी एमपीएससीने आपल्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा, UPSC Civil Services Examination 2019 Results: यूपीएससी 2019 चा निकाल जाहीर; देशार प्रदीप सिंह अव्वल, 'इथे' पाहा मेरिट लिस्ट )

एमपीएससीने आपल्या पत्रकात म्हटले आहे की, राज्य लोकसेवा आयोगाने 23 डिसेंबर 2019 या दिवशी दिलेल्या जाहीरातीत रविवार 5 एप्रिल 2020 या दिवशी राज्य लोकसेवा पूर्व परीक्षा 2020 घेतली जाईल. मात्र, देशातील आणि राज्यातील एकूण कोरोना व्हायरस संकट स्थिती पाहता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. नव्या तारखेबाबतचे पत्रक 17 जून 2020 या दिवशी जारी करण्यात आले. त्यानुसार ही पीक्षा 13 सप्टेंबर या दिवशी घेतली जाणार होती. मात्र, राष्ट्रीय परीक्षा संस्थेने राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) येत्या 13 सप्टेंबर या दिवशी घेण्याचे निश्चित केले आहे. त्याबाबत 3 जुलै 2020 या दिवशी सूचना देण्यात आली. त्यामुळे या दिवशी होणाऱ्या राज्य लोकसेवा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.