
महाराष्ट्रामध्ये यंदा दहावी, बारावीच्या परीक्षा लवकर झाल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाचे देखील वेध लागले आहेत. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 15 मे पर्यंत निकाल लावले जातील यासाठी आयोजन सुरू आहेत. 9 विभागीय मंडळात एकत्र परीक्षा आणि निकाल लावले जातात. त्यामुळे सार्या मंडळात उत्तरपत्रिका तपासणीचं काम वेगवान सुरू होते. मीडीया रिपोर्ट्सनुसार, बारावीच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन पूर्ण झाले असून, दहावीचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती देण्यात आली आहे. उत्तरपत्रिका बोर्डात जमा करण्यासाठी 8 एप्रिल ही मुदत देण्यात आली होती. 8 एप्रिलपर्यंत जवळपास पूर्ण उत्तरपत्रिका तपासून जमा झाल्याची अधिकाऱ्यांनी दिल्याचं मटा चं वृत्त आहे.
महाराष्ट्र टाईम्सच्या वृत्तानुसार,छत्रपती संभाजीनगर, लातूर विभागातील बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्याचं काम पूर्ण झाले आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात पाच जिल्ह्यात 12वीची 460 परीक्षा केंद्र होती. या पाच जिल्ह्यात पावणे दोन लाखापेक्षा जास्त विद्याथ्यांनी नोंदणी केली होती. तर लातूर विभागातील तीन जिल्ह्यात 95 हजाराच्या सुमारास नोंदणी केली होती. 249 परीक्षा केंद्रावरुन बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यानंतर लगेचच उत्तरपत्रिका तपासणीसाठी शिक्षकांकडे पाठविण्यात आल्या.
यंदा राज्यात बारावीच्या परीक्षेसाठी सुमारे 15 लाख विद्यार्थी सामोरे गेले होते. 11 फेब्रुवारी पासून त्यांच्या परीक्षा सुरू झाल्या होत्या. वेळेत निकाल लावण्यासाठी शिक्षकांना दर दिवसाला 35 उत्तरपात्रिका तपासण्याचे टार्गेट देण्यात आलं होतं. त्यानुसार आता मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
बारावीचा निकाल आधी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे त्यानंतर मार्कशीट हातात मिळणार आहे. बारावीची निकाल तारीख ही साधारणपणे निकालाच्या एक दिवस आधी जाहीर केली जाते त्यानंतर बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि काही थर्ड पार्टी साईट्स वर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.