Exam Dates| Image used for representational purpose | (Photo Credits: Unsplash.com)

Maharashtra Board SSC, HSC Exam Dates: महाराष्ट्रासह जगभर यंदा कोविड 19 (Covid 19) संकटामुळे शिक्षणाचे तीन तेरा वाजले आहेत. मागील वर्षी मार्च महिन्यापासून शाळा- कॉलेज बंद आहेत, अद्यापही त्या सुरळीत सुरू होऊ शकलेल्या नाही. त्यामुळे यंदा महाराष्ट्र राज्य बोर्ड परीक्षांचं काय? असा प्रश्न यावर्षी 10वी,12 वीची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांच्या मनात आला आहे. पण न्यूज नेटवर्क 18 च्या रिपोर्टनुसार, यंदाच्या एसएससी (SSC Exams) आणि एचएससी परीक्षेच्या (HSC Exams) तारखा या आठवड्यातच जाहीर होऊ शकतात. 10th And 12th Board Exams: दहावी, बारावीच्या परीक्षा कधी होणार? शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली 'अशी' माहिती.

दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात 12वीच्या परीक्षा आणि मार्च महिन्यात 10 वीच्या परीक्षा असतात. जानेवारी महिन्याच्या मध्यानंतर त्याचं वेळापत्रक जाहीर होतं. मात्र यंदा बोर्डाच्या परीक्षा एप्रिल - मे महिन्यात होतील असा अंदाज काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मांडल्यानंतर आता नेमकं वेळापत्रक कधी जाहीर होणार याची उत्सुकता शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांच्या मनात आहे. मागील वर्षी 12 वीची परीक्षा राज्यात सुरळीत पार पडली होती मात्र 10 चा एक पेपर रद्द झाला होता. CBSE Board Exam Dates 2021: सीबीएसईच्या 10 वी, 12 वी परीक्षांच्या तारखा जाहीर, केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांची माहिती.

सध्या राज्यात 9 वी ते 12 वीचे वर्ग सुरू झाले आहेत. पुरेशी काळजी घेत, सोशल डिस्टंसिंग पाळत शहरी आणि ग्रामीण भागात वर्ग सुरू करण्यात आले आहेत. आगामी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर आता उजळणी वर्ग सुरू आहेत.

काही दिवसांपूर्वीच शिक्षण मंडळाने पुरवणी परीक्षांचे आयोजन करून सुरक्षितपणे त्या पार पाडल्या होत्या. तसेच 2 आठवड्यात निकालही लावले त्यामुळे शिक्षण मंडळाला विश्वास आहे की त्याच धर्तीवर यंदा 10वी 12वीच्या देखील परीक्षा पार पाडू शकतात.