सध्या कोरोना विषाणूच्या (Coronavirus) काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. कॉलेजमधून बाहेर पडलेल्या अनेक फ्रेशर्सना नोकऱ्या उपलब्ध नाहीत. अशात आता आयटी (IT) क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. यंदा देशातील अनेक आघाडीच्या आयटी कंपन्या फ्रेशर्सना भरपूर संधी उपलब्ध करून देणार आहेत. डिसेंबर 2021 ला संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर करताना, दिग्गज IT कंपनी इन्फोसिस (Infosys) ने नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. कंपनीने घोषणा केली आहे की ते, 2022 या आर्थिक वर्षासाठी 55,000 हून अधिक कर्मचारी भरती करण्याची तयारी करत आहेत.
कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) निलांजन रॉय यांनी सांगितले की, कंपनीचा टॅलेंट पूल वाढवणे आणि विकसित करणे हे आमचे प्राधान्य असेल. या लक्ष्यांतर्गत, आम्ही आमच्या ग्लोबल हायरिंग प्रोग्राम अंतर्गत आर्थिक वर्ष 2022 मध्ये 55,000 हून अधिक तरुणांची भरती करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. कंपनीकडे डिसेंबर 2021 पर्यंत एकूण 2,92,067 कर्मचारी होते, त्या आधीच्या तिमाहीत 2,79,617 आणि डिसेंबर 2020 पर्यंत 2,49,312 होते.
दुसरीकडे, सप्टेंबर तिमाहीत कंपनीचे ऐच्छिक अॅट्रिशन (कंपनी सोडणाऱ्या लोकांची संख्या) 20.1 टक्क्यांवरून 25.5 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. कंपनीचे सीईओ आणि एमडी सलील पारेख म्हणाले की, कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या प्रतिभेला वाव देण्यावर आमचा भर राहील. या अंतर्गत आम्ही आमच्या ग्राहकांच्या प्रत्येक गरजा पूर्ण करण्यासाठी आमचे कर्मचारी कुशल बनवण्यावर भर देत आहोत. यासोबतच कर्मचाऱ्यांच्या हिताचाही आमच्या प्राधान्यक्रमात समावेश आहे. (हेही वाचा: Bank Of Baroda मध्ये नोकरीची संधी, इच्छुक उमेदवारांनी जाणून घ्या येथे अधिक)
दरम्यान, इन्फोसिसने 31 डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल सादर केले आहेत. या कालावधीत कंपनीला 5,809 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. कंपनीच्या नफ्यात वार्षिक आधारावर 12% वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा नफा 5,197 कोटी रुपये होता. तिसर्या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 23 टक्क्यांनी वाढून 31,867 कोटी रुपये झाले आहे, जे मागील वर्षी याच तिमाहीत 25,927 कोटी रुपये होते. कंपनीने FY22 साठी 16.5-17.5 टक्क्यांवरून 19.5-20 टक्क्यांपर्यंत कमाईचा अंदाज वाढवला आहे.