IBPS Recruitment 2022: सरकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल 7,000 लिपिक पदांची होणार भरती होणार, जाणून घ्या सविस्तर
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

बँकेत सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल बँकिंग अर्थात IBPS लिपिक भर्ती 2022 साठी जुलैपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. IBPS लिपिक भर्ती 2022 ची तपशीलवार अधिसूचना (CRP Clerk XII) अधिकृत वेबसाइट ibps.in वर 1 जुलै रोजी प्रसिद्ध केली जाईल. अर्ज भरण्यासही या दिवसापासून सुरुवात होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जुलै असेल. IBPS लिपिक भरती प्राथमिक परीक्षा 2022 अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आयोजित केली जाईल.

उमेदवारांनी त्यांचे अर्ज अंतिम तारखेपूर्वी सबमिट करावेत. त्यानंतर, कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. IBPS परीक्षा कॅलेंडर 2022 नुसार, लिपिक भरती परीक्षा 28 ऑगस्ट, 3 आणि 4 सप्टेंबर 2022 रोजी होणार आहे. IBPS लिपिक भरती प्राथमिक परीक्षा 2022 मध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल. IBPS लिपिक भरती मुख्य परीक्षा 28 ऑक्टोबर 2022 रोजी होणार आहे. आता या तात्पुरत्या तारखा आहेत. त्यात बदलही होऊ शकतो.

मिळालेल्या माहितीनुसार, या भरती प्रक्रियेतून सुमारे 7,000 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. सरकारी नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. अर्ज भरून, परीक्षेला बसून तुम्ही तुमचे सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करू शकता.

शैक्षणिक पात्रता-

IBPS लिपिक भरतीसाठी, उमेदवारांकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. तसेच संगणक प्रणाली ऑपरेट आणि त्यावरील कामे करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. संगणक ऑपरेशन/भाषेतील प्रमाणपत्र/डिप्लोमा/पदवी असणे आवश्यक आहे. (हेही वाचा: प्रादेशिक सैन्यात अधिकारी पदांची भरती; पदवीधरांना 1 जुलैपासून करता येईल अर्ज)

वयोमर्यादा-

IBPS लिपिक भरती 2022 साठी उमेदवारांचे वय किमान 20 वर्षे आणि कमाल 28 वर्षे असावे.

अर्ज शुल्क-

काही अहवालांनुसार, IBPS लिपिक पदांसाठी 2022 साठी अर्ज शुल्क सामान्य श्रेणींसाठी 850 रुपये आणि SC, ST आणि PwD श्रेणींसाठी रुपये 175 आहे. मात्र, याबाबतची अचूक माहिती लवकरच IBPS च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होईल.