FYJC Admission 2022: 11वी प्रवेशासाठी फॉर्मचा पार्ट II भरण्याला 22 जुलै पासून सुरूवात
Representational Image (Photo Credits: Unsplash.com)

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळापाठोपाठ (Maharashtra SSC Board) आयसीएसई बोर्डाचा (ICSE Board) दहावीचा निकाल लागल्यानंतर आता प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार? असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात आहे पण सीबीएसई बोर्डाचा (CBSE Board) निकाल लागल्याशिवाय प्रवेश फेऱ्यांचे वेळापत्रक जाहीर केले जाणार नाही असे स्पष्ट केले आहे. मात्र ऑनलाईन अकरावी प्रवेशाच्या अर्जाचा दुसरा भाग भरण्यासाठी 22 जुलै पासून सुरूवात होणार आहे.

अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग 2 मध्ये विद्यार्थ्यांना कॉलेजचा पसंतीक्रम भरता येणार आहे. नवीन विद्यार्थ्यांना नोंदणी करून अर्जाचा भाग 1 ही भरता येणार आहे. तर अर्जाचा भाग 2 भरण्याची प्रक्रिया शुक्रवार (22 जुलै) पासून सुरू आहे. सीबीएसई बोर्डाचा निकाल लागल्यानंतर 11वी प्रवेशासाठी सविस्तर वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. हा फॉर्मचा पार्ट 2 देखील http://11thadmission.org.in या वेबसाईट वरच भरता येणार आहे. नक्की वाचा: ICSE Board Result 2022: ICSE बोर्ड दहावी परिक्षेचा निकाल जाहीर, पुण्याची हरगुण कौर माथरू देशात पहिली .

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 17 जूनला दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. रविवार 17 जुलै दिवशी आयसीएसई बोर्डाचा देखील निकाल लागला आहे. यंदा सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाने दोन टर्ममध्ये बोर्डाची परीक्षा घेतली होती. या दोन्ही टर्मचा निकाल एकत्र करून लावला जाणार आहे.

यंदा आयसीएसई बोर्डाचा महाराष्ट्र विभागाचा निकाल 100% लागला आहे. तर एसएससी बोर्डाचा यंदाचा दहावीचा निकाल  96.94% लागला आहे. आता सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाचे वेध लागले आहेत.

दरम्यान सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी  अर्जाचा भाग 1 व  2 भरण्यासाठी  निकालानंतर 5 दिवसांचा वेळ दिला जाईल. त्यानंतर प्रत्यक्ष प्रवेशफेरीला सुरुवात होणार आहे. गुणवत्ता याद्यांचे सविस्तर वेळापत्रक यादरम्यान जाहीर केले जाईल अशी माहिती माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिली आहे.