Education Loan: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबामधील मुलांना सरकारकडून दिलासा; शिक्षणासाठी मिळणार 15 लाखांपर्यंत शेक्षणिक कर्ज
प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

राज्यातील सहकारी बँकांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींबरोबरच सर्व सामान्यांच्या उध्दार आणि समृद्धीसाठीही काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. फोर्ट येथील राज्य सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत, आमदार प्रविण दरेकर, अनंत अडसुळ, अभिजित अडसुळ यांच्यासह राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबामधील इयत्ता बारावीपर्यंत शिकलेल्या मुला-मुलींच्या पदवी शिक्षणासाठी शुन्य ते 4 टक्के व्याजदराने 15 लाखांपर्यंत शेक्षणिक कर्ज देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने ‘श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना’ सुरु करून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुला-मुलींना मोठा आधार दिला असून त्यांचे अश्रू पुसण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले असल्याचे सांगितले.

शासनाने शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती मधून बाहेर काढण्यासाठी अस्तित्वात असलेल्या योजनेचा निधी वाढवून मदत केली आहे. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानभरपाई तातडीने देण्यात आली. शेतकऱ्यांना केंद्र शासनाप्रमाणे राज्यानेही  वर्षाला 6 हजार रूपये देण्याची सन्मान योजना सुरू केली आहे. अशा विविध योजना राबवून शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

कर्जाची परतफेड करण्यासाठी 10 वर्षे कालावधी म्हणजे नोकरी लागल्यानंतर परतफेड असणार आहे. पाच लाखापर्यंतच्या कर्जासाठी तारणाची  व जामीनदारांची आवश्यकता नाही. पाच लाख ते दहा लाखापर्यंतच्या कर्जासाठी तारणाची आवश्यकता नसेल, मात्र एका जामीनदाराची आवश्यकता असेल. 10 लाख ते 15 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी तारण द्यावे लागेल, तसेच दोन जामीनदारांची आवश्यकता असेल. पाच लाखांपर्यंत शुन्य टक्के, पाच लाखांच्या वर ते 10 लाखांपर्यंत 2 टक्के तर 10 लाखांच्यावर ते 15 लाखापर्यंत 4 टक्के व्याजदर असणारी योजना राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (हेही वाचा: 'परीक्षांचे निकाल जाहीर करण्यास विलंब झाल्यास कुलगुरुंना जबाबदार धरले जाणार'- Governor Ramesh Bais)

देशातील सर्व राज्य सहकारी बँकांच्या तुलनेत राज्य सहकारी बॅंकेचा सर्वात जास्त 6,545 कोटींचा स्वनिधी,  सर्वात जास्त 45 हजार 64 कोटी रुपयांचा व्यवहार, सर्वात जास्त 3 हजार 879 कोटींचे नक्त मुल्य, सर्वात जास्त 609 कोटी रुपयांचा निव्वळ नफा हे या बँकेचे असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.