Students (प्रातिनिधिक प्रतिमा)

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठ व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन एसएनडीटी विद्यापीठाच्या पाटकर सभागृहात झाले. शिबिर उद्घाटनावेळी उपस्थित विद्यार्थी व पालकांना मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मार्गदर्शन केले.

ते म्हणाले, ‘कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार, करिअर निवड, प्रवेश प्रक्रिया, विविध अभ्यासक्रम आदींविषयी अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना असतात. छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअर संबधी दिशा देण्याचे काम केले जात आहे. विद्यार्थ्यांचे करिअर विषयक विविध प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच संकेतस्थळाची निर्मिती केली जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नांचे समाधान तातडीने उपलब्ध होईल.’

मंत्री लोढा म्हणाले की, इयत्ता 10 वी 12 वी नंतर पुढे काय संधी उपलब्ध आहेत त्याच्या मार्गदर्शनाबाबत हे शिबीर आहे. विभाग निर्माण करीत असलेल्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना ऑनलाईन आपले प्रश्न नोंदवायचे आहेत. त्या प्रश्नांना ऑनलाईनच उत्तरे देण्याची व्यवस्था असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे करिअर विषयक प्रश्नांचे समाधान तातडीने होईल. (हेही वाचा: Career Camps: खुशखबर! राज्यातील 36 जिल्ह्यांत 6 मे ते 6 जून 2023 दरम्यान करिअर शिबिरांचे आयोजन; विद्यार्थ्यांना मिळणार विविध अभ्यासक्रमांची व नवीन संधींची माहिती)

कुलगुरू डॉ. चक्रदेव म्हणाल्या की, आपणाला जे आवडते व जे नाही आवडत, ते ठरवून करिअरचा मार्ग निवडावा. पुढील पाच वर्षात आपण कुठे राहू, याचाही विचार करावा. तुमच्यामुळे भविष्यातील भारत घडणार आहे. त्यामुळे तुम्ही खूप महत्त्वाचे आहात. विचार हे मनुष्याचे व्यक्तिमत्व घडवित असतात. त्यामुळे चांगले, प्रेरक विचार असावेत. आपल्या विचारांतून कार्य होत असते. विचार केवळ स्वत:साठी करावयाचा नसून समाजाच्या कल्याणासाठी विचार करावा. त्या पद्धतीचे करीअर निवडावे.