Ease of Living Index 2020: राहण्यासाठी सर्वोत्तम शहरांच्या रँकिंगमध्ये Bengaluru देशात पहिल्या स्थानी, तर पुणे दुसऱ्या क्रमांकावर; जाणून घ्या तुमच्या शहराची रँकिंग
Bangalore City (PC - Wikimedia commons)

Ease of Living Index 2020: 1 दशलक्षाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात राहण्यासाठी बंगळुरू (Bengaluru) हे देशातील सर्वोत्कृष्ट शहर बनले आहे. दुसरीकडे, 10 लाखपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये शिमला पहिल्या स्थानावर आहे. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने गुरुवारी ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स रँकिंग्ज -2020 (Ease of Living Index India 2020) जाहीर केले. केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कार्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी हा अहवाल प्रसिद्ध केला. विशेष बाब म्हणजे देशाची राजधानी असलेल्या दिल्लीलाही या दोन प्रकारात दहाव्या क्रमांकावर पोहोचता आलं नाही. यात दिल्ली 13 व्या स्थानावर आहे.

राहण्यासाठी सर्वोत्तम शहरांच्या रँकिंगमध्ये देशभरातील 111 शहरांनी भाग घेतला होता. यात शहरे दोन विभागात विभागली गेली आहेत. पहिल्या श्रेणीत 1 दशलक्षाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांचा समावेश आहे, तर दुसर्‍या श्रेणीत 1 दशलक्षाहून कमी लोकसंख्या असलेल्या शहरांचा समावेश आहे. या शहरांमध्ये असे दिसून आले की त्यांच्यामध्ये राहण्याची गुणवत्ता उच्च दर्जाची आहे. तसेच या शबरात अनेक ​​विकासात्मक कामे झाली आहेत, त्याचा लोकांच्या जीवनावर काय परिणाम झाला आहे, हे देखील यातून स्पष्ट करण्यात आलं. (वाचा - Swachh Survekshan 2020 Results: स्वच्छ शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील नवी मुंबई तिसऱ्या स्थानी; 1 लाखांहून कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या क्रमवारीत टॉप 3 मध्ये कराड, सासवड, लोणावळा)

2018 मध्ये रँकिंगला सुरुवात -

2018 मध्ये पहिल्यांदा शहरांची क्रमवारी लावली गेली होती. त्यानंतर 2020 मध्ये शहरांची क्रमवारी लावण्यात आली. या वर्गात प्रामुख्याने तीन पिलर्स आहेत, हे पिलर्स राहण्याची गुणवत्ता असून त्याकरिता रँकिंगसाठी 35% गुण ठेवण्यात आले आहेत. दुसरा आधारस्तंभ आर्थिक पात्रतेसाठी 15 टक्के गुण आणि विकासाची स्थिरता कशी आहे, यासाठी 20 टक्के गुण होते. उर्वरित 30 टक्के गुण लोकांमध्ये झालेल्या सर्वेक्षणाद्वारे ठरविण्यात आले होते.

1 दशलक्षाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांची यादी -

शहर आणि स्कोअर

बेंगलुरू - 66.70

पुणे - 66.27

अहमदाबाद - 64.87

चेन्नई - 62.61

सूरत- 61.73

नवी मुंबई - 61.60

कोयंबटूर - 59.72

वडोदरा-.2 .2 .२4

इंदूर - 58.58

बृहत्तर मुंबई - 58.23

1 दशलक्षाहून कमी लोकसंख्या असलेल्या शहरांची क्रमवारीत

शहर आणि स्कोअर

शिमला - 60.90

भुवनेश्वर - 59.85

सिल्वासा -58.43

काकीनाडा - 56.84

सालेम - 56.40

वेल्लोर - 56.38

गांधीनगर - 56.25

गुरुग्राम -56.00

दावणगेरे -55.25

तिरुचिराप्पल्ली - 55.24

दरम्यान, या शहरांसाठी 14 श्रेणी तयार करण्यात आल्या. या श्रेणींमध्ये त्या शहरातील शिक्षणाचे स्तर, आरोग्य, गृहनिर्माण व निवारा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, आर्थिक विकासाची पातळी, आर्थिक संधी, पर्यावरण, हरित क्षेत्र, इमारती, ऊर्जा वापराचा आढावा घेण्यात आला. यानंतर तेथील लोकांमध्ये एक सर्वेक्षण करण्यात आले. हे सर्वेक्षण 19 जानेवारी 2020 ते मार्च 2020 या काळात करण्यात आले. या सर्वेक्षणात 32 लाख 20 हजार लोकांनी आपले मत नोंदवले. हे अभिप्राय ऑनलाइन अभिप्राय, क्यूआर कोड विविध माध्यमातून घेण्यात आले. त्यानंतर सर्व 111 शहरांचे पुनरावलोकन केले गेले आणि त्यांना क्रमवारी दिली गेली.