Beating | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

राजस्थानमधील (Rajasthan) धौलपूर (Dhaulpur) जिल्ह्यातील बारी उपविभागात एका दलित मुलीवर (Dalit girl) अस्पृश्यता आणि अत्याचाराची घटना समोर आली  आहे. तहसीलच्या सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एका दलित मुलीवर  अस्पृश्यता आणि अत्याचाराच्या तक्रारीनंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुकानात जात असताना मुलीच्या हाताचा दुकानदाराला स्पर्श झाला. त्यानंतर प्रकरण आणखी चिघळले. मुलीचा हात लागताच दुकानदाराने मुलीला मारहाण (Beating) केली. तिला वाचवण्यासाठी आलेल्या मोठ्या बहिणीलाही मारहाण केल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आला आहे.

त्याचबरोबर मुलीवर अत्याचार झाल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर आरोपीकडून कुटुंबावर गाव सोडून जाण्यासाठी दबाव टाकला जात आहे. या प्रकरणातील आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागले नसल्याचा आरोप दलित कुटुंबीय करत आहेत. मात्र, पोलिसांनी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण 8 मे चे असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र 6 दिवस उलटून गेल्यानंतरही पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवर कोणतीही सुनावणी झालेली नाही.

त्याचवेळी कुटुंबीयांनी आता एसपीकडे न्यायासाठी दाद मागितली आहे. बारी उपविभागातील सदर पोलीस स्टेशन हद्दीतील नाकसौदा गावातील प्रकरणानुसार पीडित दलित कुटुंबाने सांगितले की, 8 मे रोजी सायंकाळी 5 वाजता त्यांची मुलगी गावातील एका दुकानातून सामान घेण्यासाठी गेली होती. त्यादरम्यान तिचा हात चुकून दुकानदाराच्या हाताला लागला. या प्रकरणावरुनच गदारोळ झाला. हेही वाचा  Crime: आंब्याची कोय लागल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये राडा, 15 वर्षीय मुलावर चाकूने हल्ला

दुकानदाराने आपल्या मुलांसह आधी दलित मुलीला मारहाण केली आणि नंतर पीडितेची मोठी बहीण तिला सोडवण्यासाठी आली तेव्हा तिलाही मारहाण केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मारहाणीच्या घटनेत जखमी झालेल्या दोन्ही बहिणींना बारी रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथून त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. या संपूर्ण प्रकरणाबाबत बारी सदर पोलीस ठाण्यात नामांकित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मात्र पोलिसांनी अद्याप आरोपींवर कोणतीही कारवाई केलेली नाही, असा आरोप पीडित दलित कुटुंबाच्या प्रमुखाने केला आहे. त्याचवेळी 6 दिवसांचा कालावधी लोटल्यानंतर पीडित कुटुंबाने आता जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे याप्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे की, या प्रकरणात गाव सोडण्यास भाग पाडले जात आहे. त्याचवेळी, पोलिसांचे म्हणणे आहे की, पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून, एससी-एसटी कायद्यानुसार तसेच संबंधित कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास केला जात आहे.