राफेल: काँग्रेसने घेतली 'सीव्हीसी'ची भेट; कागदपत्रे सील करुन एफआयआर दाखल करण्याची मागणी
काँग्रेस नेते आनंद शर्मा प्रसारमाध्यमांशी बोलताना (Photo Credits: ANI)

राफेल डीलमध्ये झालेल्या कथीत भ्राष्टाचारावरुन भाजप प्रणीत मोदी सरकारला घेरण्याचा पूरेपूर प्रयत्न काँग्रेस करत आहे. काँग्रेस नेत्यांनी आज (सोमवार, २४ सप्टेंबर) केंद्रीय सतर्कता आयोगाची (Central Vigilance Commission )भेट घेतली. या भेटीत काँग्रेसने राफेल संदर्भात सर्व कागदपत्रे सील करुन एफआयआर दाखल करण्याची मागणी केली. सीव्हीसीला भेटून परतताना माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, राफेलचा संपूर्ण व्यवहार पंतप्रधानांनी स्वत: केला आहे. १० एप्रिल २०१५ला पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी केलेली विधानं महत्त्वपूर्ण आहेत. त्या दिवशीच्या दोन्ही विधानांमधून स्पष्ट होते की, ही दोन्ही विमाने आहेत जी वायुसेनेने मागितली होती.

आनंद शर्मा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पुढे सांगितले की, या व्यवहारांमधील सर्व कागदपत्रे सील केली जावीत. तसेच, सीव्हीसीकडून या प्रकरणाबाबत गुन्हाही दाखल करण्यात यावा. सीव्हीसीची जाबाबदारी आहे की, ज्या सरकारमध्ये इतका मोठा घोटाळा झाला आहे. ते कागद कुठे गायब होऊ नयेत. त्यासाठी सीव्हीसीने तातडीने कारवाई करायला हवी. राफेल डील एक मोठा घोटाळा आहे. दरम्यान, आनंद शर्मा यांच्यासोबत उपस्थित असलेले रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, घोटाळ्यात फसल्यानंतर भाजप निराधार वक्तव्ये करत आहे.

दरम्यान, याही आधी आनंदर शर्मा आणि रणदीप सुरजेवाला यांच्यासोबत काही काँग्रेस नेत्यांनी सीव्हीसीची भेट घेत चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, विरोधी पक्षांच्या नेत्यांनी यापूर्वी कॅगसोबत चर्चा केली होती. तसेच, या व्यवहाराचा एक अहवाल तयार करावा. हा अहवाल संसदेत सादरकरण्यात यावा.