लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक अनोख्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. प्रचाराचे विविध फंडे, नेत्यांची वक्त्यव्ये, त्यामुळे उठलेली टीकेची झोड अशा गोष्टी तर कॉमन आहेतच. मात्र या पेक्षा वेगळी एक घटना घडली आहे, एक वादविवादाचा कार्यक्रम, 'सबसे बड़ा सवाल' न्यूज 24 (NEWS 24) या वाहिनीवर चालू होता. टीव्हीवरील कार्यक्रमात दोन विरोधी पक्ष एकमेकांवर टीका करतातच, तसेच कॉंग्रेस आणि भाजप प्रवक्ते भांडत होते. मात्र लाईव्ह चाललेल्या या शोमध्ये कॉंग्रेस प्रवक्ते आलोक शर्मा (Alok Sharma) यांनी भाजप प्रवक्ते केके शर्मा (KK Sharma) यांच्यावर चक्क पाणी फेकून मारले. या गोष्टीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
या वादविवादामध्ये भाजप प्रवक्त्यांनी कॉंग्रेस प्रवक्त्यांसाठी गद्दार अशा शब्दाचा उपयोग केला. यावरून आलोक शर्मा भडकले, आणि दोघांमध्ये खडाजंगी सुरु झाली. या दरम्यान आलोक शर्मा सतत हेच म्हणत होते की, त्यांच्याकडून मला गद्दार कसे काय म्हटले जावू शकते? त्याचवेळी त्यांचा स्वतःवरील ताबा सुटला आणि त्यांनी तुमच्या सारखे लोक गद्दार आहेत असे म्हणत रागाने जोरात पाण्याचा ग्लास फेकला. या सर्वांमध्ये बिचाऱ्या सुत्रसंचालक साहेबांची कोंडी झाली, कारण हे पाणी त्यांच्याही चेहऱ्यावर उडाले. (हेही वाचा: पटना येथे काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची हाणामारी, पाहा व्हिडिओ)
ही घटना घडल्या नंतरही आलोक शर्मा चिडलेलेच होते. मात्र केके शर्मा यांना त्यांच्या भिजलेल्या फोनची चिंता होती. या फोनचे काय झाले तर तुम्ही रिप्लेस करून द्याल का? असा प्रश्न ते विचारतात. परिस्थिती शांत झाल्यावर सुत्रसंचालक साहेबांनी त्यांना सर्वांची माफी मागायला सांगितले. मात्र केके शर्मा यांनीदेखील आपली ‘गद्दार’ म्हटल्याबद्दल माफी मागायला पाहिजे या भूमिकेवर ते ठाम राहिले.