PM Modi On Congress: भारत मंडपम (Bharat Mandapam) येथे रविवारी झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाला (BJP National Convention) पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) संबोधित केले. जैन ऋषी विद्यासागर यांना श्रद्धांजली अर्पण करून पंतप्रधान मोदी यांनी भाषणाला सुरुवात केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधत काँग्रेसला अस्थिरता, घराणेशाही आणि तुष्टीकरणाची जननी म्हटले. काँग्रेसही अजूनही कारस्थान रचत असल्याचा दावाही मोदींनी केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्त्यांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, भाजप कार्यकर्ते वर्षातील प्रत्येक दिवशी, 24 तास देशाची सेवा करण्यासाठी काहीतरी करत राहतात. पण आता पुढचे 100 दिवस नव्या ऊर्जेने, नव्या उमेदीने, नव्या आत्मविश्वासानेकाम करायचे आहेत. आज विरोधी पक्षाचे नेतेही एनडीए सरकार 400 च्या विरोधात घोषणा देत आहेत. एनडीएला 400 चा टप्पा पार करण्यासाठी भाजपला 370 चा टप्पा पार करावा लागेल, असं पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे बोलताना म्हणाले की, आज 18 फेब्रुवारी आहे आणि या काळात 18 वर्षांचे झालेले तरुण देशाच्या 18व्या लोकसभेसाठी निवडून येणार आहेत. पुढील 100 दिवस आपण सर्वांनी मिळून काम करायचे आहे. प्रत्येक नवीन मतदार, प्रत्येक लाभार्थी, प्रत्येक वर्ग, समाज, पंथ, परंपरा या सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे. आपण सर्वांचा विश्वास संपादन केला पाहिजे. सर्वांचे प्रयत्न होतील तेव्हा भाजपला जास्तीत जास्त जागा मिळून देशसेवा होईल. (हेही वाचा - Lok Sabha Elections: लोकसभा निवडणूक 2024 कधी होणार? मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिले 'हे' मोठे अपडेट)
भारताचा विकास हेचं आमचे स्पप्न - पंतप्रधान
गेल्या 10 वर्षात भारताने जी गती गाठली आहे, मोठी उद्दिष्टे साध्य करण्याचे धाडस दाखवले आहे, ते अभूतपूर्व असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. भारताने आज प्रत्येक क्षेत्रात जी उंची गाठली आहे, त्यामुळे प्रत्येक देशवासीयांना मोठ्या निर्धाराने एकत्र केले आहे. हा विकसित भारताचा संकल्प आहे. आता देश ना छोटी स्वप्ने पाहू शकतो ना छोटे संकल्प करू शकतो. स्वप्नेही मोठी असतील आणि संकल्पही प्रचंड असतील. भारताचा विकास करायचा आहे, हे आमचे स्वप्न आणि संकल्पही आहे.
उपभोगासाठी सत्ता नको - पंतप्रधान
आम्ही छत्रपती शिवाजींना मानणारे लोक आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा ते म्हणाले नव्हते की, सत्ता मिळाली तर उपभोग घेऊया. त्यांनी आपले ध्येय चालू ठेवले. मी माझ्या स्वतःच्या आनंदासाठी आणि गौरवासाठी जगणारी व्यक्ती नाही. मी भाजप सरकारची तिसरी टर्म सत्ता उपभोगण्यासाठी मागत नाही. मी देशासाठी संकल्प घेऊन बाहेर पडलेला व्यक्ती आहे. (हेही वाचा -Lok Sabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीत 47 कोटी महिलांसह 96 कोटी नागरिक मतदानासाठी पात्र)
आपल्या सरकारच्या कार्यकाळात महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या कामाबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, आज भाजप युवा शक्ती, महिला शक्ती, गरीब आणि शेतकऱ्यांची शक्ती वाढवावी यासाठी प्रयत्न करत आहे. येणाऱ्या काळात आपल्या माता, बहिणी आणि मुलींना संधी मिळतील. मिशन शक्ती देशातील महिला शक्तीच्या संरक्षण आणि सक्षमीकरणासाठी एक संपूर्ण परिसंस्था निर्माण करेल. 15 हजार महिला बचत गटांना ड्रोन मिळणार आहेत. आता ड्रोन दीदी शेतीत वैज्ञानिकता आणि आधुनिकता आणणार आहेत. आता देशातील 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार आहे. शतकानुशतके प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्याचे धाडस आपण दाखवले आहे.
पंतप्रधानांकडून राम मंदिराचा उल्लेख -
अयोध्येत भव्य राम मंदिर बांधून आपण 5 शतकांची प्रतीक्षा संपवली आहे. गुजरातमधील पावागडमध्ये 500 वर्षांनंतर धार्मिक ध्वज फडकवण्यात आला आहे. 7 दशकांनंतर आम्ही करतारपूर साहिब महामार्ग खुला केला आहे. 7 दशकांच्या प्रतीक्षेनंतर देशाला कलम 370 मधून स्वातंत्र्य मिळाले आहे, असंही यावेळी पंतप्रधान मोदींनी नमूद केलं.