टीव्ही मालिकांमध्ये भाजप पक्षाचा प्रचार; निर्मात्यांना निवडणूक आयोगाची नोटीस, 24 तासांत स्पष्टीकरण देण्याचे आदेश
मालिकांच्या निर्मात्यांना नोटीस (संग्रहित-संपादित प्रतिमा)

लोकसभा निवडणुका (Lok Sabha Elections) जशा जशा जवळ येत आहेत, तस तसे आचारसंहितेचे पालन काटेकोरपणे होताना दिसत आहे. निवडणूक आयोग अगदी दक्ष होऊन गोष्टींवर लक्ष ठेवत आहे. अशात टीव्ही मालिकेतून ठराविक पक्षाचा प्रचार करणाऱ्या निर्मात्यांना निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या मालिकेच्या निर्मात्यांना 24 तासांत स्पष्टीकरण देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. या मालिकांविरोधात काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. यामध्ये मराठी आणि हिंदी मालिकांचा समावेश आहे.

भाजपकडून टीव्हीवरील मालिकांचा उपयोग सत्ताधारी पक्षाच्या योजनांचा व नेत्यांच्या प्रचार व प्रसार करण्याकरिता केला जात आहे. हा प्रकार गेल्या आठवडाभरापासून सुरू आहे. यामध्ये ‘तुला पाहते रे’, ‘भाभीजी घर पर है’, ‘तुझसे है राबता’ आणि ‘कुंडली भाग्य’ या मालिकांचा समवेश आहे. भाभीजी घर पर है आणि तुझसे हे राबता या कार्यक्रमाच्या माध्यमातून मोदी सरकारच्या योजनांचा प्रचार होत असल्याचा दावा काँग्रेसने केला होता.

याबाबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्वीट केले आहे. ज्यामध्ये ते म्हणतात, 'भाजपा दिवसेंदिवस हीन पातळीवर जाऊन राजकारण करत आहे. आता मालिकांचा उपयोग प्रचाराकरिता केला जात आहे. पराभवाच्या भितीने भाजपाच्या पायाखालची वाळू सरकत आहे. त्यामुळे भाजपा अशाप्रकारे मालिकांच्या माध्यमातून प्रचाराचं तंत्र वापरत आहे. निवडणूक आयोगाकडून या प्रकरणाची चौकशी व्हायलाच हवी.’ (हेही वाचा: नमो टीव्ही वादाच्या भोवऱ्यात, दूरदर्शनलाही निवडणूक आयोगाचे पत्र)

दरम्यान, नरेंद्र मोदींच्या नावाने सुरू झालेल्या ‘नमो टीव्ही’ (NaMo TV) ला निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. निवडणुका काही दिवसांवर आल्या असताना 31 मार्चला हे चॅनल सुरु झाले. या चॅनलला परवानगी दिलीच कशी? अशी तक्रार आप आणि कॉंग्रेस पक्षाने केली होती. तसेच निवडणूक आयोगाने दूरदर्शनला असेच पत्र पाठवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'मैं भी चौकीदार' कार्यक्रम लाईव्ह दाखवल्याने निवडणूक आयोगाने दूरदर्शनला नोटीस जारी केली आहे.