Jammu-Kashmir Update: काश्मीरच्या अवंतीपोरातील पम्पोर भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, 1 दहशतवादी ठार
File image of security forces in Jammu and Kashmir (Photo Credits: IANS)

काश्मीरच्या (Kashmir) अवंतीपोराच्या (Avantipora) पम्पोर (Pampore) भागात आज सुरक्षा दल (Security forces) आणि दहशतवाद्यांमध्ये (Terrorists) चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार केले आहे. जम्मू -काश्मीर पोलिसांनी माहिती दिली आहे की सुरक्षा दलांनी सध्या संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. तसेच चकमक अजूनही सुरू आहे. पोलिसांनी सांगितले आहे की मारला गेलेला दहशतवादी कोण आहे आणि तो कोणत्या दहशतवादी गटाशी संबंधित होता, त्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलीस (Jammu kashmir Police) अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्हाला काही दहशतवाद्यांनी पम्पोर परिसरात लपल्याची बातमी मिळाली होती. यानंतर, जेव्हा आमचे जवान त्या भागात शोध मोहीम करण्यासाठी गेले. तेव्हा दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. चकमकीदरम्यान दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले गेले. परंतु त्यांनी नकार दिला आणि सुरक्षा दलांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. सुरक्षा दल आणि दहशतवाद यांच्यात चकमक झाली. यात एक दहशतवादी ठार झाला आहे.

काल कुलगाममध्ये (Kulgam) दहशतवाद्यांनी त्यांच्या पक्षाचे नेते गुलाम हसन लोन यांची गोळ्या घालून हत्या केली आहे. पीडीपीमधून राजीनामा देऊन लोन चार महिन्यांपूर्वी आपल्या पक्षात सामील झाले होते. गेल्या सुमारे 15 दिवसांत दहशतवाद्यांनी अशा प्रकारची तिसरी घटना घडवली आहे. भाजप नेते जावेद अहमद दार यांची 17 ऑगस्ट रोजी कुलगाममधील ब्रजलू जागीर भागात दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली होती.  यापूर्वी 9 ऑगस्ट रोजी दहशतवाद्यांनी कुलगाममध्ये भाजपच्या किसान जिल्हा युनिटचे अध्यक्ष गुलाम रसूल दार यांची हत्या केली होती.

दहशतवाद्यांनी तेथून पळून जाऊ नये म्हणून सुरक्षा दलाच्या अतिरिक्त तुकड्यांना चकमकीच्या ठिकाणी बोलावण्यात आले. एका दहशतवाद्याला ठार केल्यानंतर सुरक्षा दल वारंवार दुसऱ्या दहशतवाद्याला आत्मसमर्पण करण्यास सांगत आहे पण दोन्ही बाजूंकडून गोळीबाराची प्रक्रिया सुरू आहे. ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटलेली नाही. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की लवकरच आणखी एक दहशतवादी मारला जाईल.