उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Photo Credits : IANS)

Hathras Gangrape Case: उत्तर प्रदेशातील हाथरस येथे दलित मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणासंदर्भात आज मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath) यांनी या प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. विरोधी पक्षांकडून या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात येत होती.

दरम्यान, पीडितेच्या कुटूंबियाने सीबीआय चौकशीची मागणी केलेली नाही. शनिवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. यादरम्यान पीडितेच्या कुटूंबाने या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सीबीआय चौकशीचे आदेश जारी केले आहेत. माध्यमांशी बोलताना पीडितेच्या कुटूंबियाने सीबीआय चौकशीवर समाधान व्यक्त केलं आहे. (हेही वाचा - Hathras Gangrape Case: राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह 5 जणांना हाथरसला जाण्यास परवानगी, उत्तर प्रदेश सरकारचे प्रशासन एक पाऊल मागे)

पीडितेच्या भावाने सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी आमची इच्छा होती. मात्र, सीबीआय चौकशी ठीक आहे. पीडितेचा मृतदेह अशाप्रकारे का जाळला? डीएमने त्यांच्याशी गैरवर्तन का केले? असे अनेक प्रश्न पीडितेच्या भावाने विचारले आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पीडितेच्या भावाला न्यायाचे आश्वासन दिले आहे. पीडितेच्या कुटुंबाच्या पाठीशी उभा असून अन्यायाविरूद्ध लढा देण्यास समर्थ असल्याचंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. याशिवाय राहुल गांधी यांनी पीडितेच्या कुटूंबाला आर्थिक मदतदेखील देऊ केली आहे.